भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट यांनी “हम तुम्हे मरने ना देंगे” या अनोख्या टॉक शोची घोषणा केली आहे. महेश भट्ट आणि ‘ड्रामा टॉकीज’ प्रस्तुत, हा शो आपल्याला भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील अशा पैलू आणि घटनांशी जोडतो ज्याबद्दल आजपर्यंत लिहिले गेले नाही किंवा सांगितले गेले नाही. 15 ऑगस्ट रोजी, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे की हा एक अनस्क्रिप्टेड टॉक शो असेल ज्यामध्ये महेश भट्ट इतिहासाच्या पानांवरील लपलेल्या आठवणी आणि अनकथित गोष्टी उघड करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना भेटतील आणि संवाद साधतील. भगतसिंग, मंगल पांडे, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, बाबा साहेब आंबेडकर आणि अशा अनेक स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या जीवनाशी निगडित अनकथित कथा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अस्पर्शित पैलू “हम तुम्हे मरने ना देंगे” या माध्यमातून प्रथमच प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहेत.
मंगल पांडे यांचे व्यक्तिमत्त्व काय होते? बाळ गंगाधर टिळकांचे देशभक्तीबद्दल काय विचार होते? महात्मा गांधींनी भारताचे कोणते चित्र पाहिले आणि भगतसिंग यांच्या क्रांतिकारी विचारांमागचा सज्जन व्यक्ती कसा होता, हे सर्व रंजक टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळेल, हा शो चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट, होस्ट करणार आहेत. तर त्याचे दिग्दर्शन सुहरिता दास करणार आहेत.
महेश भट्ट म्हणतात की, “हम तुम्हे मरने ना देंगे” हा एक असा शो पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ज्या विहिरीतून आपण पाणी पीत आहोत त्या विहिरी आपल्या पूर्वजांनी, आपल्या हुतात्म्यांनी खोदल्या होत्या. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा, त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा आणि इतिहासाच्या पानांमध्ये न सापडलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे . खर तर भूतकाळापासून दूर गेलेला देश हा दिशाहीन होतो. आजची पिढी मनोरंजनावर अधिक विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी हे सत्य सामोरे येणे गरजेचे आहे. या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांची गाथा ऐकल्यावर नवीन पिढी मध्ये एक वेगळा जोश दिसेल.
ड्रामा टॉकीजच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘हम तुम्हे मरने ना देंगे’च्या दिग्दर्शिका सुहरिता दास सांगतात की, प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना ह्रदयस्पर्शी संभाषण पाहायला मिळतील. कारण ह्या संभाषणात देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या स्वप्नाची गाथा ऐकायला मिळेल. त्यामुळे नवीन पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल.
त्या शहीदांच्या आठवणींना उजाळा देतानाच, या शोमध्ये आजच्या समाजावर त्या खऱ्या नायकांचा काय प्रभाव पडतो यावरही चर्चा केली जाईल. क्रांतिकारकांचा आणि ज्यांनी देश घडवला त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतो आणि आधुनिक भारताच्या हृदयात अभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करतो. हा टॉक शो भूतकाळातील नायकांना केवळ श्रद्धांजलीच नाही तर या वीरांच्या आत्म्याचा जिवंत पुरावाही आहे. “हम तुम्हे मरने ना देंगे” लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे