नागपूर दिनांक १४ ऑगस्ट–पुण्याच्या नैशा रेवसकर (१७ वर्षाखालील मुली) व वरदान कोलते (११ वर्षाखालील मुले) यांनी विजेतेपद पटकावित द्वितीय मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धेत पुणेकरांचे आव्हान राखले.
महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने व नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे सुभेदार सभागृह येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील सतरा वर्षाखालील मुलींच्या अंतिम फेरीत नैशा हिने ठाण्याच्या काव्या भट्ट या अव्वल मानांकित खेळाडूचा पराभव करीत सनसनाटी विजेतेपद पटकावले. हा सामना तिने ११-९,११-४,६-११,११-७ असा जिंकला. ती पुण्यातील एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. नैशा हिला १५ वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत मात्र पराभव स्वीकारावा लागला. टीएसटी मुंबई संघाची खेळाडू दिव्यांशी भौमिक या अग्रमानांकित खेळाडूने तृतीय मानांकित नैशा हिचा ११-२,११-८,११-३ असा पराभव केला.
मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात बारावा मानातील खेळाडू वरदान याने तृतीय मानांकित खेळाडू यश कोल्हे याच्यावर मात करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला हा सामना त्याने ११-९,७-११,११-९, ५-११,११-५ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर जिंकला. तो पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत आहे. सतरा वर्षाखालील गटात पुण्याच्या कौस्तुभ गिरगावकर याला विजेतेपदाने हुलकावणी दिली. तृतीय मानांकित कौस्तुभ याला टीएसटी मुंबई संघाचा अग्रमानांकित खेळाडू ध्रुव शाह याने ११-८,१२-१०,१२-१० असे पराभूत केले.
या स्पर्धेतील अन्य गटात आद्या बाहेती (११ वर्षाखालील मुली), मायरा सांगळेकर (१३ वर्षाखालील मुली), परम भिवंडकर (१३ वर्षाखालील मुले), नीलय पट्टेकर (१५ वर्षाखालील मुले) हे विजेतेपदाचे मानकरी ठरले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस यतीन टिपणीस, सचिव ॲड.आशुतोष पोतनीस, नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे कार्यकारणी सदस्य मुकुंद कांबळे, मुख्य पंच मंगेश मोपकर तसेच दीपक कानेटकर, अशोक राऊत, जयेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.
स्पर्धेचे गटवार अंतिम निकाल- अकरा वर्षाखालील मुली- आद्या बाहेती (परभणी) विजयी विरुद्ध केशिका पूरकर (नाशिक) ९-११,११-९,११-९,११-८. मुले-वरदान कोलते (पुणे) विजयी विरुद्ध यश कोल्हे (मुंबई महानगर जिल्हा) ११-९,७-११, ११-९,५-११,११-५.
तेरा वर्षाखालील मुली-मायरा सांगळेकर (टी एस टी मुंबई) विजयी विरुद्ध त्रिशा लुडबे (टी एस टी मुंबई) ११-७,११-३, ४-११, ११-५. मुले-परम भिवंडकर (टी एस टी मुंबई) विजयी विरुद्ध झैन शेख (टी एस टी मुंबई) ११-५,११-५,११-८.
पंधरा वर्षाखालील मुली-दिव्यांशी भौमिक( टी एस टी मुंबई) विजयी विरुद्ध नैशा रेवसकर (पुणे) ११-२,११-८,११-३. मुले- नीलय पट्टेकर (ठाणे) विजयी विरुद्ध परम भिवंडकर (टी एस टी मुंबई) ११-५,६-११, ११-७,९-११,११-५.
सतरा वर्षाखालील मुली-नैशा रेवसकर (पुणे) विजयी विरुद्ध काव्या भट्ट (ठाणे) ११-९, ११-४,६-११,११-७. मुले- ध्रुव शाह (टीएसटी मुंबई) विजयी विरुद्ध कौस्तुभ गिरगावकर (पुणे) ११-८,१२-१०,१२-१०.