मुंबई-बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आम्ही मोठी चूक केली, अशी स्पष्ट कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी दिली. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते. पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली, असे ते म्हणालेत. त्यांच्या या कबुलीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा कूस बदलते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून आव्हान दिले होते. सुनेत्रा या अजित पवार यांच्या पत्नी होत्या. त्यामुळे नणंद भावजयीमधील या सामन्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. त्यात सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आपण मोठी चूक केल्याचे विधान केले आहे.
अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून एक चूक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभे करण्याची काहीच गरज नव्हती. पण तसे केले गेले. पक्षाच्या संसदीय मंडळाने तो निर्णय घेतला होता. त्यामुळे एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही. पण राजकारण पार घरात शिरू द्यायचे नसते. आज माझे मन मला हे सांगत आहे. तसे व्हायला नको होते.
भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधणाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यातच अजित पवार यांनी सुप्रियांना बारामतीत आव्हान देण्याची गरजच नव्हती असे विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यावेळी अजित पवार यांना तुम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी जाणार का? असा प्रश्न केला असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. सध्या माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेन, तर मी राखी बांधून घेण्यासाठी निश्चितच माझ्या बहिणींकडे जाईन, असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्या या विधानावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही प्रतिक्रिया समोर येत आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत आपल्याला अजित पवारांच्या विधानाची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी रामकृष्ण हरी म्हणत बोलणे टाळले. तर काँग्रेसच्या एका नेत्याने अजित पवार यांना हळूहळू आपल्या सर्वच चुका लक्षात येतील असा दावा केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या जनसन्मान यात्रा सुरू आहे. या निमित्ताने अजित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत. या दौऱ्यात ते सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य मतदारांना विशेषतः महिला वर्गाला आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या सर्वच गाड्यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. स्वतः अजित पवारही पांढऱ्या सदऱ्यावर पिंक जॅकेट घालत आहेत. यामुळे राष्ट्रवादीची ही यात्रा पूर्णतः गुलाबीमय झाली आहे.
विशेष म्हणजे अजित पवार यांनी सोमवारीच धुळे जिल्ह्यातील एका शेतात जाऊन तिथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला होता. यावरून अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंग झटकून कामाला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात स्वतःच्या पत्नीला रिंगणात उतरवणे ही माझी चूक होती, हे अजित पवार यांचे विधान प्रतिमासंवर्धनाचा एक प्रयत्न असल्याचाही आरोप केला जात आहे.