राज्यातील खोकेबाज आणि धोकेबाज सरकार घालवून, मविआचे सरकार येणार: नाना पटोले
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपला पराभूत करून इतिहास घडवा: बाळासाहेब थोरात.
महायुतीने राज्य गुजरातकडे गहाण टाकले, राज्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी विधानसभेची लढाई: विजय वडेट्टीवार.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याची विधानसभा निवडणुकीच्या तयारीची आढावा बैठक व खासदारांचा सत्कार सोहळा संपन्न.
छत्रपती संभीजनगर, दि. १२ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. २०१९ ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता पण २०२४ मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक व मराठवाड्यातीव खासदार यांच्या सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला, त्यावेळी चेन्नीथला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष आमिर शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, छत्रपती संभाजी नगर काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ शेख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी २००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली ती केवळ निवडणुका डोळ्यासमोर केली आहे. याच संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ते मोदी-शाह यांचे हस्तक आहेत’ असे म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा मुख्यमंत्री गुजरातचा हस्तक कसा असू शकतो? महायुती सरकार हे खोकेबाजच नाहीतर धोकेबाजही आहे, या लबाडांचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण १० वर्ष सत्ता असतानाही आरक्षण मात्र दिले नाही. भाजपा व फडणवीस यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावली आहेत, त्यात जनतेने पडू नये मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी तुम्हाला न्याय देतील. गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार जाऊन महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार येणार हे काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाही व राज्यघटनेवर आघात होत असताना देशातील सर्वसामान्य माणूस काँग्रेस इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल. भारतीय जनता पक्षाला अहंकार झाला होता तो अहंकार जनतेने भेदून टाकला आहे आता विधानसभा निवडणुकीलाही इतिहास घडवायचा आहे. खोके देऊन आमदार फोडून बनवलेले हे खोके सरकार भ्रष्टाचाराने माखलेले आहे. या सरकारचा भ्रष्टाचार विधानसभेत मांडला पण सरकारने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून निवडणुका लढवायचे काम महायुती करत आहे. या भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्यासाठी विधानसभेला जास्तीत जागा निवडून आणा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, भाजपाने लोकसभेला रामाच्या नावाने मते मागतिली पण जेथे जेथे प्रभूरामाचा पावन स्पर्श झाला त्या त्या जागी भाजपाचा पराभव झाला. महायुती सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे, ५ लाख कोटी रुपायांची टेंडर मंजूर करून त्यातून लुट केली आहे. एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले, महिंद्राचा २५ हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार होता तोही गुजरातला घेऊन गेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खूर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे आता राज्याच्या स्वाभिमान परत आणण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे.
यावेळी बोलताना विधानपरिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यशाचा पाया घातला आहे विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळवून त्यावर कळस चढवायचा आहे आणि मविआचे सरकार आणायचे आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यावेळी म्हणाले की, अल्पसंख्यांक विभाग मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या पाठाशी उभा राहिला आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा अल्पसंख्यांक समुदायाला योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे. भाजपा कधी हिंदू-मुस्लीम, स्मशान-कबरस्थान, पाकिस्तान करते आणि आता व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहादच्या फेक नॅरेटीववर मते मागत आहे पण जनता भाजपाच्या या विखारी प्रचाराला बळी पडणार नाही.
यावेळी बोलताना माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख साहेब आमचे नेते आहेत, काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने काही कमी दिलं नव्हतं, लोकांना हे आवडलं नाही म्हणून लोकांनी दाखवून दिलं की “कल जो रंग थे आज वो दाग हो गये”. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो त्यामुळे मराठवाड्यातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू. खा. डॉ.कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले.