पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२४:नवीन वीजजोडण्यांसह विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे भविष्यवेध घेऊन विजेची वाढती मागणी पूर्ण करणाऱ्या वितरण यंत्रणेचे जागेच्या उपलब्धतेसह नियोजन करावे. प्रामुख्याने घरगुती ग्राहक, शेतकरी बांधव आणि इतर ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या विविध योजनांची प्रभावी व वेगाने अंमलबजावणी करावी. तसेच ग्राहकसेवा व तक्रार निवारणातील तत्परता आणखी वाढविण्यासाठी विभाग किंवा उपविभाग कार्यालयांचे विभाजन आवश्यक असल्यास प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.
गणेशखिंड येथील ‘प्रकाश भवन’च्या परिसरात महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला छतावरील ६० किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीजपुरवठा करण्यात येत आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शनिवारी (दि. १०) राज्यातील या पहिल्या हरित ऊर्जेवरील चार्जिंग स्टेशनची व सौर प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार आणि अधीक्षक अभियंते श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. लोकेश चंद्र यांनी पुणे परिमंडलातील विविध कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर ऊर्जा कृषिपंप तसेच वीजयंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) आदी योजनांद्वारे वीजक्षेत्रामध्ये ग्राहकाभिमुख आमुलाग्र सुधारणा होणार आहेत. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांना लाभ मिळवून देणे हे महावितरणमधील प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे.
पुणे परिमंडलमध्ये सहा अतिउच्चदाबाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्ताव मंजूर करून महापारेषणकडे पाठविण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या चाकण व भोसरी उपविभागांचे विभाजन करून नवीन उपविभाग व शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. वेगाने वाढत असलेली ग्राहकसंख्या व विजेची मागणी पाहता अशा प्रकारच्या प्रस्तावांसाठी व्यवस्थापन सकारात्मक आहे, असे श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले. वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी आणखी काही नव्या योजनांचा प्रस्ताव आहेत. मात्र पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या महानगरांमध्ये वीजयंत्रणांसाठी जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी केली.
गणेशखिंड येथील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी छतावरील सौर ऊर्जेद्वारे गेल्या दोन महिन्यांमध्ये १४हजार ४०० युनिट विजेची निर्मिती झाली आहे. चार्जिंगसाठी विद्युत वाहनधारकांना केवळ १३ रुपये प्रतियुनिट दर आकारणी केली जात असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष पाटणी यांनी दिली. यावर समाधान व्यक्त करीत पुणे परिमंडल अंतर्गत इतरही विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्याची सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली. यावेळी त्यांनी गणेशखिंड उपविभाग कार्यालयाला भेट दिली व ग्राहकसेवा, विद्युत सुरक्षा साधनांचा वापर आदींबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सचिन पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश टेकाळे, विद्युत सहायक गणेश गोरे यांच्याशी थेट संवाद साधला. या प्रसंगी कार्यकारी अभियंते श्री. संजीव राठोड, श्री. अशोक जाधव, श्री. भाऊसाहेब सावंत आदींची उपस्थिती होती.