अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे महिला बचतगटांचा सन्मान सोहळा ; एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत भोसरी दिघी रोड येथील समिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, धायरी बेनकरवस्ती येथील पिंपळपान महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि बाणेरगाव येथील अहिल्या महिला बचत गटाने तृतीय क्रमांंक पटकाविला.
गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सुरेखा कुडची, नीषानी बुरुले, शिवानी मुंधेकर, मयुरी देशमुख व अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते.
अन्नपूर्णा महिला बचत गट कसबा पेठ, उत्कर्ष महिला बचत गट भवानी पेठ, आधार महिला बचत गट सिंहगड रस्ता, मोगरा महिला बचत गट कोंढणपूर, गोल्डन १ महिला बचत गट दौंड, लयभारी महिला बचत गट घोरपडी, रमाबाई महिला बचत गट थिटेवस्ती या बचतगटांनी देखील पारितोषिके पटकाविली. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, मिक्सर यांसह ११ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. लकी ड्रॉ व चालता बोलता कार्यक्रमातील १०० विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला मार्गदर्शन मिळाले आहे.
स्पर्धेमध्ये समिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ५१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पिंपळपान महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ३१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अहिल्या महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये २१ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ ७ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अक्षय मोरे यांनी चालता बोलता हा कार्यक्रम घेतला.