वाघोली येथील प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील प्रकल्पांची पाहणी
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२४:घरगुती वीजग्राहक तसेच गृहनिर्माण संस्थांना वीजबिल शून्यवत करण्याची सुवर्णसंधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे घरगुती वीजग्राहकांनी सरकारी अनुदान असलेल्या या योजनेत सहभागी असे आवाहन राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला यांनी रविवारी (दि. ११) केले.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून वाघोली येथे कार्यान्वित झालेल्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची रविवारी (दि. ११) अपर मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
वाघोली येथील न्याती एलान सोसायटीच्या कॉमन वीजवापरासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून १० किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच याच सोसायटीमध्ये पंकज मुटेरी, श्यामादेवी सिंघानिया यांनीही घरगुती वीजवापरासाठी प्रत्येकी ३ किलोवॅटचा वैयक्तिक सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या तिनही सौर ऊर्जा प्रकल्पांची तसेच जनरेशन मीटर, नेटमीटरची सौ. आभा शुक्ला व श्री. लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. तसेच सोसायटीच्या अध्यक्ष सौ. ममता जोशी, सचिव निरंजन कारवेकर, श्री. रवींद्र वाळके, श्री. गणेश कोलते आदींशी संवाद साधला.
‘पूर्वी दरमहा साडेचार ते पाच हजार रुपये येणारे वीजबिल आता शून्यवत झाले आहे. मार्चमध्ये अर्ज केल्यानंतर सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी, जनरेशन मीटर, नेटमीटर कार्यान्वित झाले आहे. या योजनेनुसार वीजबिल देखील सुरु झाले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती, स्वतः वापरलेली वीज व महावितरणला विकलेली वीज याची युनिटप्रमाणे माहिती दरमहा वीजबिलामध्ये नमूद असल्याने या योजनेचा प्रत्यक्ष झालेला मोठा फायदा अनुभवास येत आहे’, अशी माहिती वीजग्राहक पंकज मुटेरी यांनी दिली.
यानंतर सौ. आभा शुक्ला व श्री. लोकेश चंद्र यांनी न्याती एलान सोसायटीच्या वीजमीटर रूमची पाहणी केली. तेथील नागरिक आणि महावितरणच्या वाघोली शाखेतील जनमित्रांशी ग्राहकसेवा, वीज सुरक्षा आदींबाबत संवाद साधला. यावेळी अधीक्षक अभियंते श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता नीलेश रासकर, सहायक अभियंता श्री. दीपक बाबर यांची उपस्थिती होती.