एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा आरोप केल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान रोहित पवाार पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना दिला आहे.
‘त्या’ पत्राचा गैरवापर
आमदार रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का?. पटेल यांच्यावर देखील गंभीर आरोप आहेत, असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे. तर अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, त्या पत्रात नेमके काय लिहले आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापने त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावा देखील पवारांनी केला आहे.
रोहित पवारांची भुजबळांवर टीका
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. छगन भुजबळ यांनी ज्या युट्यूबरचा दाखला देत रोहित पवार यांच्यावर हल्ला केला होता त्याच युट्यूबरने भुजबळ सत्तेत नव्हते तेव्हा त्यांच्यावरही जहरी टीका केली होती. याचेच हे स्क्रिनशॉट आहेत. याचा दाखला देत रोहित पवार यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
रोहित पवारांचे टविट काय?
आदरणीय भुजबळ साहेब,
#युवा_संघर्ष_यात्रा युवांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन चालत असल्याने संघर्ष यात्रेला कुठेही विरोध झाला नाही. आपण भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात इतके दंग झालात की भाजप ट्रोल आर्मीचा भाग असलेल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत खास असलेल्या एका युट्यूबरचा आपण दाखला देऊन माझ्यावर टीका केली. आपण ज्या घटनेचा उल्लेख केला, त्या घटनेबद्दल मी पंधरा दिवसांपूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मी पुन्हा स्पष्टीकरण देऊन आपला वेळ घेणार नाही.
आपणास अजून आपल्याला नव्या सहकाऱ्यांचे खरे रूप कळलेले दिसत नाही. त्यामुळे स्क्रिप्ट वाचताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. याच युट्यूबरने सत्तेत जाण्यापूर्वी आपल्यावरही असेच बदनामी करणारे अनेक व्हिडिओ केले आहेत आणि त्यातील काही स्क्रीन शॉट इथे शेअर करत आहे. आपण ते व्हिडीओ एकदा जरूर बघावेत. त्यानंतर कदाचित आपण भाजपच्या स्क्रिप्ट वाचताना नक्की काळजी घ्याल, हा विश्वास आहे.

