पुणे-फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी विधान केले आहे.ते अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने येथे आयोजित समारंभासाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंद आहे. माणसाने एक एक पायरी वर चढायची असते. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे सर्व गुण आहेत. जर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबाबतीत असा विचार केला असेल तर आम्हाला आनंद आहे”, असे पाटील म्हणाले.
पुढे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ”उद्धव ठाकरे अलिकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करतात. माणसांनी तेच बोलावं पण व्यवस्थित बोलावं. नीट बोलल्यावर ऐकणाऱ्याला लाख मोलाचे बोलला असे वाटते. उद्धव ठाकरे जे बोलले त्याची प्रतिक्रिया सामान्य माणसातून येणार आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये फडणवीसांबद्दल प्रेम आहे. अशा प्रकारचा त्रागा पूर्वी ठाकरे करत होते. जनतेने किती वेळा तेच तेच मुद्दे ऐककयचे” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याबाबत गद्दारीची टीका केली जाते. मात्र त्यांनी गद्दारी केली की तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला त्यामधून एकनाथ शिंदे यांनी स्वतःची वाट शोधली. आता तुम्ही त्यांचा हिंदुत्वाचा गळा दाबत होता हे सर्वसामान्यांना माहित आहे. एक मित्र म्हणून मी उद्धव ठाकरे यांना सल्ला देईल की, त्यांचे सरकार आल्यावर काय करणार हे सांगितले पाहिजे. त्यांची अशा प्रकारची आगपाखड का सुरू आहे हा प्रश्न आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.