मुंबई-मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणार हे वास्तव होते, खोटा नेरेटीव्ह नव्हता, हे अखेरीस सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार यांनी नक्कीच उत्तर द्यावे असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आज सर्व माध्यमांवर NCRT च्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा प्रवेश रोखला गेला, अशा बातम्या आल्या आहेत. त्यामुळे मनुस्मृती हे लोक अभ्यासक्रमात आणणार होते, म्हणजेच यांची बुद्धी किती किडलेली आहे, हेच यातून दिसून येत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.
या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आज सर्व माध्यमांवर NCRT च्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा प्रवेश रोखला गेला, अशा बातम्या आल्या. अनेक लोकांनी NCRT कडे तक्रारी केल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला. हा विषय पहिल्यांदा जेव्हा मी उचलला तेव्हा नेहमीच्या सवयीने , ‘असे काही होणार नाही, आम्ही असे काही करणारच नाही’ , असे युती सरकारमधील सगळेच जण बोलायला लागले होते. पण, हे सत्य आहे, हे मला माहित होते. हे सरकार शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणणार होते, याची मला पूर्ण खात्री होती. आज अखेरीस NCRT नेच मनुस्मृती पुस्तकात घेण्याचे रद्द केल्याचे जाहीर केले. किती खोटारडे सरकार आहे हे! नंतर म्हणतात की, खोटा नेरेटीव्ह सेट केला. जे वास्तव असते त्यालाच ते खोटा नेरेटीव्ह म्हणतात.’
या संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणले की, ‘मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणार हे वास्तव होते, खोटा नेरेटीव्ह नव्हता, हे अखेरीस सिद्ध झाले. ही मनुवादी बुद्धीची माणसे दुसरं करू काय शकतात? ज्या मनुने या समाजव्यवस्थेचे वाटोळे केले; ज्या मनुने आपल्या लिखाणातून स्त्रियांना अतिशय हीन वागणूक दिली. चातुर्वर्ण्य ज्याने निर्माण केले आणि भारताच्या संस्कृतीची राखरांगोळी केली. तीच मनुस्मृती हे लोक अभ्यासक्रमात आणणार होते, म्हणजेच यांची बुद्धी किती किडलेली आहे, हेच यातून दिसून येते. अजितदादांनी यावर नक्कीच उत्तर द्यावे, कारण, अजितदादा म्हणाले होते की, “अभ्यासक्रमात मनुस्मृती येऊ देणार नाही. आम्ही असे काही केलेलेच नाही, सरकारमध्ये असे काही ठरलेलेच नाही.” मग, आता हे काय?’