फडणवीस हे मोदी – शहांचे मिक्स व्हर्जन
भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून उपस्थित होत आहे. कारण भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांची मोदी 3.0 सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या प्रकरणी अनेक नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत. त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी खरेच निवड झाली तर ते या पदापर्यंत पोहोचणारे नितीन गडकरी यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरतील.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे सुगीचे दिवस आल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.देवेंद्र फडणवीस हे भाजप अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य व फिट उमेदवार मानले जात आहेत. कारण, त्यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशीच चांगले संबंध नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) त्यांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे खूप चांगले व जिव्हाळ्याचे संबंध आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांच्या मते, फडणवीस हे पंतप्रधान मोदी व अमित शहा यांचे मिक्स व्हर्जन आहेत. ते पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी व अमित शहा यांच्या कूटनितीला मूर्त स्वरुपात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटूंब पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे भाजप श्रेष्ठी फडणवीस यांना पक्षात एक महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते. या वृत्तात सूत्रांचा दाखला देत नमूद करण्यात आले आहे की, आतापर्यंत संघ व भाजपमध्ये नव्या भाजप अध्यक्षांच्या नावावरून मतभेद होते. यामुळेच आतापर्यंत या पदावर कुणाचीही नियुक्ती झाली नाही. पण आता फडणवीस यांच्या नावर मतैक्य होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे फडणवीस व मोदी यांची भेट महत्त्वाची आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. यापूर्वी नागपूरच्याच नितीन गडकरी यांनी भाजपचे अध्यक्षपद सांभाळले आहे. राजकीय गोटात चर्चा आहे की, फडणवीस यांनी पक्षाचे सर्वोच्च पद सांभाळले तर पक्षाला एकाचवेळी अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात फडणवीसांविरोधात कथित रोष आहे. पक्षाला त्याचा ताकदीने निपटारा करता येईल.
एवढेच नाही तर पक्ष नव्या नेतृत्वासह आगामी निवडणुकांना सामोरा जाईल. फडणवीस जातीने ब्राह्मण आहेत. त्यांचे सर्वोच्च नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचे नेतृत्व देण्यात कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. यापूर्वी विनोद तावडे यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा रंगली होती. पण आता त्यांचे नाव मागे पडले आहे. त्यानंतर सुनील बंसल यांच्याही नावाची चर्चा झाली. पण देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांवरही कुरघोडी करत शर्यतीत आघाडी घेतली.
राजकीय वर्तुळात पंतप्रधान मोदी व फडणवीस यांच्या भेटीकडे अनेक अंगाने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत विशिष्टपणे फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यातही फडणवीस व त्यांचे चांगले संबंध दिसून आले होते. फडणवीस हे अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे फडणवीस खरेच केंद्रात गेले तर राज्यात पक्षाचा नवे नेतृत्व उभे करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.