दुहेरी बेस्ट लिफ्टर इंडियासह भरघोस आठ सुवर्णपदकांची कमाई मास्टर्स पावर लिफ्टिंग मध्ये गाजविले निर्विवाद वर्चस्व
पुणे : डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक प्रकारात स्कॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट असे मिळून एकूण ३७८ किलो वजन उचलून नॅशनल रेकॉर्डसह चार सुवर्णपदके कमावली. तर इक्विप्ड चॅम्पियनशिप मध्ये ४१० किलो वजन उचलून त्यात देखील चार सुवर्णपदके जिंकली. त्यांनी महिलांच्या ५७ किलो वजनी गटात नवीन स्कॉट व टोटल रेकॉर्ड प्रस्थापित केले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स असा मानला जाणारा मानाचा स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया किताब त्यांनी यावेळी सहाव्यांदा पटकावला.
इंदोर मधील वाघेला गार्डन येथे राष्ट्रीय क्लासिक व इक्विप्ड पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. त्यात २६ राज्यांच्या सुमारे ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
याच स्पर्धेत डॉ. शर्वरी यांच्या आई डॉ. पूर्णा वसंत भारदे यांनी ७६ किलो साठ वर्षापुढील गटात दोन सुवर्ण व सहा रजत पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या या मायलेकींनी पदकांची लयलूट करत ही स्पर्धा गाजवली. डॉ. वैभव इनामदार हे दोघींनाही मार्गदर्शन करतात.
एप्रिल महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या ओपन क्लासिक नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये डॉ. शर्वरी यांनी महाराष्ट्रासाठी दोन सिल्वर व एक गोल्ड मेडल अशी भरघोस कमाई केली होती. मागील वर्षी भारतासाठी डॉ. शर्वरी आणि डाॅ. पूर्णा भारदे यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील जिंकली होती.
