मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर १०० कर्मचाऱ्यांची मोफत स्वच्छता सेवा
पुणे (प्रतिनिधी) : कोसळधार पावसामुळे सिंहगड रोड परिसरातील आनंद नगर व एकता नगर परिसरात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. पहाटेच्या वेळेला घरात पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी ओसरल्याने पार्कीग, बाथरूम व टॉयलेटमध्ये चिखलाचा थर जमा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेने सामना करावा लागत आहे. सदर परिसर “डीप क्लीन” करण्यासाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) कंपनीची मदत घेण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाला केली होती. मुख्यमंत्र्याच्या सूचनेची अमंलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच १०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी या भागात पाठवले आहेत. घरातील सदस्य असल्याप्रमाणे स्वच्छता कर्मचारी नागिरकांना स्वच्छता सेवा देत आहेत. सदर स्वच्छता सेवा पुढील चार दिवस राबवण्यात येणार असून यासाठी कोणताही मोबदला घेण्यात येणार नाही.
सोसायटी व रहिवासी परिसर स्वच्छ करण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने ट्रक माउंटेड जेट मशीनचा वापर करण्यात आहे. या मशीनमुळे पार्कीग, टॉयलेट व बाथरूममध्ये साठलेला चिखल काढला जातो आहे. घरात पाणी शिरल्याने लाकडी फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लाकडी फर्निचर स्वच्छ करण्याचे काम बीव्हीजी कर्मचारी करत आहेत.
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने जीवनउपयोगी असलेल्या अनेक बाबी निरऊपयोगी झाल्या आहेत. निरऊपयोगी झालेल्या बाबी ट्रकमध्ये भरून देण्यासाठी सुद्धा बीव्हीजीचे कर्मचारी मदत करत आहेत.
स्वछता हीच सेवा
मानवतावादी दृष्टीकोनातून बीव्हीजी परिवार स्वच्छता सेवेचे काम करत आहे. मुसळधार पावसामुळे बाधीत झालेल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मुख्यमंत्री यांनी बीव्हीजी परिवाराला दिली. पुढील चार दिवस बीव्हीजी परिवार या परिसरात स्वच्छता सेवा देणार आहे.
हणमंतराव गायकवाड
चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक (बीव्हीजी)