छत्रपती संभाजीनगर-दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत अमित शहांवर बोलणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्या सारखे आहे असे म्हंटले होते. बावनकुळे यांच्या याच विधानाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला आहे असे पवार म्हणाले. पवार असे बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिवाय मराठा आरक्षणाबाबत देखील सरकारला सल्ला दिला आहे. याच पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला होता.