छत्रपती संभाजीनगर-मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे.यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले,”आरक्षणाच्या मुद्यावरून दुर्दैवाने आज राज्यात दोन वेगळे गट पडले आहेत. त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्यकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकाची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे”, असे शरद पवार म्हणाले.
”आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन समाजात दरी निर्माण होते की काय असे चित्र आहे. विशेषतः मराठवाड्याच्या दोन ते तीन जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. याप्रकरणी चर्चा आणि संवाद होणे महत्वाचे असल्याने सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.शरद पवार म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. या प्रश्नात मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. सरकारने जो संवाद साधला पाहिजे होता, तो झाला नाही असं मला वाटतं, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. जरांगे आणि त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि इतर लोक संवाद ठेवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण दुसरे जे घटक आहेत, जे जरांगेंना विरोध करत आहेत, त्यांच्याशी सरकारमधील दुसरे लोक सुसंवाद ठेवत आहेत हे कशासाठी? त्यांनी दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करावी”.
लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच
शरद पवार यांनी यावेळी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही परिणाम होईल” असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवार म्हणाले, ”लोकसभेत दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे भाजपच्या काही लोकांनी 400 जागा पाहिजे सांगितलं. त्यांनीच नव्हे तर मोदींनीही अशीच भूमिका मांडली होती. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकजुटीने मतदान केले पाहिजे, असा विचार लोकांनी केला. त्यामुळे 400 वरून चित्र खाली आले”, असे शरद पवारांनी म्हटले.