पुणे सार्वजनिक सभेतर्फे आयोजन ; एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची उपस्थिती
पुणे : पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांच्या तिथीनुसार जयंती निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ सभेतर्फे सार्वजनिक काका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अरण्येश्वर येथील सुपर्ण कार्यालयात पुरस्कार सोहळा झाला. पितांबरीचे रवींद्र प्रभूदेसाई यांना सार्वजनिक काका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कोषाध्यक्ष सुरेश कालेकर, कार्यवाहक शरद गर्भे, विश्वस्त विजय मराठे, धनाजी चन्ने, अरविंद नवरे, अंजली वैद्य, अनंत मोडक, सुरेश भावे आदी यावेळी उपस्थित होते. अखिल ब्राह्मण महासभा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचा देखील सन्मान करण्यात आला.
भूषण गोखले म्हणाले, आजकाल समाजामध्ये विभाजन होताना दिसते आहे. अशावेळी सार्वजनिक काका यांचे स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या आधीच्या कठीण परिस्थितीत संस्थेचे काम हे ऊर्जा देणारे होते, असेही त्यांनी सांगितले.
रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, लोकांना एकत्र करून संघटन करणारी उत्तुंग व्यक्तिमत्व स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. वसुधैव कुटुंबकम ही आपली शिकवण आहे. कोणत्याही जाती धर्मातील प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. जे आपल्यात फूट पाडतात त्यांना सांगायला हवे, तुम्ही किती ही फूट पाडली तरी आम्ही एक आहोत. हीच प्रेरणा पुणे सार्वजनिक सभेतून मिळते. सरकारी नोकऱ्यांना मर्यादा आहे. त्यामुळे नोकऱ्या देणारे उद्योजक निर्माण व्हायला पाहिजेत. भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे देशात जर उद्योजकता वाढली तर देश नक्कीच महासत्ता होईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्याधर नारगोलकर म्हणाले, पुणे सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना २ एप्रिल १८७० साली झाली. आज संस्थेने १५४ वर्ष पूर्ण केली आहेत. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान करीत त्यांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रम देखील संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले.
अनिल शिदोरे म्हणाले, काळ बदलत गेला त्याप्रमाणे संस्थेचे कामाचे स्वरूप देखील बदलत गेले. १०० वर्षांपूर्वी समाज वेगळा होता, समाजासमोरील आव्हाने वेगळी होती. परंतु लोकांच्या माध्यमातून समाज एकत्र यावा हे संस्थेचे सूत्र तेव्हापासून आजही कायम आहे. समाजातील महिला एकत्र याव्यात यासाठी पुणे सार्वजनिक सभेने शंभर वर्षांपूर्वी हळदीकुंकू कार्यक्रम सुरू केला होता, आजही तो सुरू आहे.

