पुणे, दि. २४ जुलै २०२४: महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून श्री. भुजंग खंदारे यांनी बुधवारी (दि. २४) पदभार स्वीकारला. सरळ सेवा भरती प्रक्रियेत कार्यकारी संचालक/ प्रादेशिक संचालक म्हणून श्री. खंदारे यांची नुकतीच निवड झाली. याआधी ते महावितरणच्या मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता (प्रकल्प) म्हणून कार्यरत होते.
प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. श्री. खंदारे १९९९ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर २०१० मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या पदावर त्यांनी रायगड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत काम केले आहे. सन २०१६ मध्ये श्री. खंदारे यांची अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती झाली. नाशिक व छत्रपती संभाजीनगर परिमंडलात पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे.
सन २०१८ मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये श्री. भुजंग खंदारे यांची मुख्य अभियंतापदी निवड झाली. या पदावर त्यांनी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे व मुंबई मुख्यालयात प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता म्हणून काम केले. आता नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत कार्यकारी संचालक/प्रादेशिक संचालक पदी त्यांची निवड झाली आहे.उत्कृष्ट टेबल टेनिसपटू असलेले श्री. खंदारे यांनी आठ वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महावितरणचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेचे नोडेल अधिकारी म्हणून काम केले आहे. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. भुजंग खंदारे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन, पायाभूत आराखड्यासह विविध प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मोठे योगदान दिले आहे.तसेच २०१० मध्ये उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्री. खंदारे यांना ‘महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासोबतच तक्रारींचे विनाविलंब निवारण करणे तसेच महावितरणच्या महसूलवाढीसह मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) यासह विविध योजनांना आणखी वेग देण्यात येईल असे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी सांगितले.

