पुणे- लोहीयानगर भागात कारवाई करून खडक पोलिसांनी दोन पॅगो टेम्पोतून ६ लाख १९ हजारांचा गुटखा पानमसाला जप्त केला. तर, गुटखा विकणार्या एकाला अटक केली. गुटखा आणि टेम्पो असा एकूण १० लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अकिब शकिल शेख (वय ३२, रा. लोहीयानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राज्यभरात गुटखा, पानमसाल्याच्या विक्रीसह साठवणूक तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, काही जणांकडून छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून अशा विक्रेत्याचा शोध घेवून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार खडक पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान लोहीयानगर भागातील सोनमार्ग गल्लीमध्ये एकजण गुटखा विकण्यासाठी आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांनी सापळा रचून संबंधीत ठिकाणाहून दोन पॅगो टेम्पो जप्त केले. तर, शेख याला ताब्यात घेतले. टेम्पोमध्ये विमल पानमसाला, प्रिमीयम राज पानमसाला, सुगिंधत तंबाखू असा ६ लाख १९ हजारांचा साठा आढळून आला. गुटख्याचा साठा आणि दोन पेगो टेम्पो असा एकूण १० लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

