पुणे -शहरातील खडक पोलिसांकडून २०२३ आणि २०२४ मध्ये हरविलेले आणि गहाळ झालेले ४ लाख किंमतीचे २५ मोबाईल नागरिकांना परत दिले.पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांनी २०२३ आणि २०२४ मध्ये नागरिकांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेल्या मोबाईल आणि गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश खडक पोलिसांना दिले होते. त्यानुसार खडक पोलिसांकडून मोबाईल आणि चोरांचा पुणे शहरात आणि इतर जिल्ह्यांमध्ये तांत्रिक विश्लेषण करून शोध घेण्यात येत होता.
खडक पोलिसांनी चोरीला गेलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी सी. ई. आय. आर या पोर्टलमध्ये तक्रार नोंदवून शोध घेतला. ४ लाख किंमतीचे २५ मोबाईल परत मिळविण्यात यश पोलिसांना आले. हे मोबाईल शुक्रवारी (१९ जुलै) रोजी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले आहे. त्या मोबाईल मध्ये महत्वाचा डाटा, कागदपत्रे असल्याने संबंधित नागरिक त्रस्त होते. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी खडक पोलिसांचे धन्यवाद मानले.
ही कामगिरी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त मछिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार सागर कुडले यांनी केली.