पुणे – शासनाकडून देण्यात येणाऱ्या रेशनवरील धान्याचा लाभ छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील ५० हजार अधिक नागरिकांना व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला आहे.
शिधावाटप कार्यालयात अतिरिक्त एफडीओ खताळ, रेशन पुरवठा निरीक्षक (क विभाग) संगिता खोमणे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) शिरोळे यांनी बैठक घेतली आणि त्यात नागरिकांना भेडसावणारे अनेक गंभीर मुद्दे मांडले.
शिधावाटप कार्यालयाचे पोर्टल आणि सार्वजनिक लॉगिन प्रणाली अत्यंत संथ आणि अविश्वसनीय आहे, ज्यामुळे पोर्टलवर नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व्हर समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष आमदार शिरोळे यांनी वेधले.
संथ सर्व्हर आणि पोर्टलमुळे, नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड मिळवणे खूप कठीण जात आहे. या कार्डांशिवाय ते वैद्यकीय मदत आणि कव्हरेज घेऊ शकत नाहीत, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.
शिवाजीनगर मतदारसंघात २३हजार पेक्षा जास्त कुटुंबे आहेत, अंदाजे १ लाख नागरिक ज्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या रेशनवरील धान्याचा लाभ होतो. माझा प्रयत्न असा आहे की, यादीत अतिरिक्त ५० हजार अतिरिक्त नागरिक जोडले जावेत, असे उद्दिष्ट आमदार शिरोळे यांनी बैठकीत मांडले.
या मुद्यांचा पाठपुरावा करून, कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिधावाटप कार्यालयात पुढील बैठक दि.२० ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.