पुणे- पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांनी सावध पवित्रा घेतला आहे ते म्हणाले, पक्षांतराची चिन्हे दिसायला सुरुवात भोसरी विधानसभेपासून झाली आहे, मला माहिती आहे प्रत्येकालाच आमदार व्हायचं आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांची साथ सोडत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. अजित गव्हाणे यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली आहे. भारतीय जनता पक्षासोबत याठिकाणी काम करण्यास मी इच्छुक नाही, अजित पवार पालकमंत्री असताना देखील शहराचा विकास झालेला नाही, त्याचबरोबर आगामी विधानसभा लढवण्याच्या अनुषंगाने आपण शरद पवार गटासोबत जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं .त्यानंतर आज अजितदादांनी येथे बैठक घेऊन माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला . आणि त्यांची मते जाणून घेत सबुरीचा सल्ला दिला .

पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्याच्या घटनेवर आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. ते म्हणाले, “मला ते काही दिवसांपूर्वी भेटले होते. भोसरी विधानसभेत सध्या भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना असं वाटलं की महायुतीकडून आपल्याला संधी मिळणार नाही. आता प्रत्येकालाच आमदार व्हायचं आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण होणार आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी विधानसभेसाठी आपला एक उमेदवार देणार आहे. समोरून देखील महाविकास आघाडी आपला उमेदवार देईल. मात्र त्यांच्यातीलही दुसऱ्या ताकदीच्या नेत्याला वाटलं की आपल्याला इथं संधी मिळणार नाही, त्यानंतर तिथले नेतेही पक्षांतर करतील. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला विधानसभा निवडणुकीपर्यंत पाहायला मिळू शकतं. याची सुरुवात भोसरी विधानसभेतून झाली आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत आपली भूमिका मांडली आहे.
अजित गव्हाणे यांच्यासोबत माजी महापौर हणमंतराव भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे पुत्र यश साने, माजी नगरसेवक संजय नेवाळे, वसंत बोराटे, विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, अनुराधा गोफने, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकीरण गवळी, विजया तापकीर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे, विशाल आहेर, युवराज पवार, कामगार आघाडीचे विशाल आहेर, नंदूतात्या शिंदे, शरद भालेकर या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.