मुंबई-राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व त्यांच्यासोबत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सुदैवाने बचावले आहेत. या घटनेनंतर अजित पवार यांनी प्रवासातला त्यांचा अनुभव सांगत माझ्या तर पोटात गोळाच उठला होता. पण पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरल्याचे ते म्हणाले.खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. पायलटने हेलिकॉप्टर मोठ्या कौशल्याने जमिनीवर उतरवले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. काही काळ हेलिकॉप्टर भरकटल्याने आत बसलेल्या नेत्यांचा जीव मात्र टांगलीला लागलेला होता. विठ्ठल..विठ्ठल..म्हणत तर मी देवाचा धावाच करत होतो, असे अजित दादांनी सांगितले.
राजकीय नेत्यांना सातत्याने विविध भागात प्रवास करावा लागतो. एकाच दिवशी अनेक कार्यक्रम असतात. त्यात राज्याच्या प्रमुखांना हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. यात त्यांना विशेष काळजी देखील घ्यावी लागते. तर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केला. परंतु या प्रवासात झालेला धक्कादायक अनुभव व हेलिकॉप्टर कसे भरकटले होते याची आपबीती त्यांनी सांगितली. गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा. लि. या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला.
अजित पवारांनी आपल्या भाषणावेळीच गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काय घडले, याचा प्रसंगच सांगितला. अजित पवार म्हणाले की, तुम्हाला कल्पना नाही, भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील. जेव्हा आम्ही येत होतो, खूप ढग होते. नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो.. सर्व घाबरून होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर, त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे ही.. असेही अजित पवारांनी म्हटले.
गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरुन दिले आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे. आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले आता सुरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरु केला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो, त्यांनी आपली वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे. तर, उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहितीही त्यांनी दिली.