मुंबई-विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. या फुटीर आमदारांनी MLC निवडणुकीत भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांची नावे दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. पटोले यांनी या फुटीर आमदारांसाठी ‘बदमाश’ हा शब्द वापरला आहे हे विशेष.
12 जुलैच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदाराचा मोठा घोडेबाजार झाला. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्ताधारी महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडूनि आले. याऊलट महाविकास आघाडीचे केवळ 2 उमेदवार निवडून आले व एकाचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मतांची बेगमी नसतानाही मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी का दिली? याचे राजकारण नंतर बाहेर येईलच. पण ज्या काँग्रेसचे आमदार फुटले त्यांच्यावर तत्काळ कारवाई काय होणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी बोलताना गेल्यावेळी सुटलेल्या बदमाशांना यावेळी सापळा रचून पकडण्यात आल्याचे स्पष्ट केले. भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करून काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे पटोले यांनी दिल्लीला पाठवली आहेत. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही संकेत दिलेत. विधानपरिषदेच्या गेल्या निवडणुकीतही काही बदमाशांनी बदमाशी केली होती. तेव्हा त्यांना पकडता आले नव्हते. पण यंदा त्यांना पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला होता. त्यात ते सापडलेत, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे एकूण 69 मते होती. त्यात काँग्रेसच्या 37, ठाकरेंच्या 15 व शरद पवारांच्या 12 मतांसह शेकापच्या 1, सपच्या 2 तथा माकप व अपक्षाच्या प्रत्येकी एका मताचा समावेश होता. पण महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर व जयंत पाटील या 3 उमेदवारांना पहिल्या पसंतीची केवळ 59 मते मिळाली. यात काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 25 मते मिळाली. याचा अर्थ काँग्रेसचे उर्वरित मते फुटली हे स्पष्ट आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते देण्याचे निश्चित केले होते. म्हणजे सातव यांना मतदान करण्याची सूचना केलेल्या काँग्रेसच्या 28 पैकी 3 आमदारांनी त्यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले.
दुसरीकडे, शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाची 12 मते पडली आहेत. नार्वेकरांना ठाकरे गटाची 15 व काँग्रेसची शिल्लक मते मिळाली. त्यांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची 7 मते मिळाली. उर्वरित मते महायुतीला वळती झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी काँग्रेसवर तीव्र आगपाखड करत बंडखोर आमदारांवर 48 तासांत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे राजकारणही चांगलेच तापले आहे.