पुणे, दि. ११: पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी राज्यशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘आई’ योजनेची प्रसिद्धी पर्यटन संचालनालयामार्फत एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून पालखी मार्गावर करण्यात येत आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हा चित्ररथ चालविण्यात येत आहे.
पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून चित्ररथ तयार करण्यात आला आहे. विभागीय कार्यालयापासून उपसंचालिका शमा पवार आणि पर्यटन संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लोणंदपासून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून पंढरपूरपर्यंत योजनेची माहिती देण्यात येणार आहे.
पर्यटन विभागाच्यावतीने जून २०२३ पासून ‘आई’ योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटन व्यवसाय हा पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक असून पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी.
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गंत पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत. महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी उपयुक्त उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.
महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या https://maharashtratourism.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत पुणे विभागामध्ये ४८ अर्ज, अमरावती १७, नागपूर १२, कोकण २५, नाशिक १२ व संभाजीनगरमध्ये ७१ अर्ज प्राप्त झालेले असून त्यामध्ये अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. या क्षेत्रांत व्यवसाय करणाऱ्या किंवा नव्याने व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन संचालानयामार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाशी उपसंचालक कार्यालय, विभागीय पर्यटन कार्यालय, एमटीडीसी कार्यालय, आय बरॅक, मध्यवर्ती इमारत पुणे ४११ ००१ दूरध्वनी क्र. ०२०-२९९००२८९/८०८००३५१३४ ईमेल – ddtourism.pune-mh@gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.