पुणे – दिवेघाटात , कात्रजच्या घाटात बिबट्या दिसल्यानंतर आता चांडोली परिसरातील महावितरणच्या कार्यालयात सकाळी एक बिबट्या शिरला. यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच घाम फुटला. बिबट्या कार्यालयात शिरल्याचे पाहताच त्याला तो जिथे लपला त्याच खोलीचे दार लावून कुलुपबंद केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीम या बिबट्याला पकडून जंगलात नेऊन सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रेस्क्यू टीमने त्याला पकडले आहे.
पुणे शहरालगतचे आणि जिल्ह्यातील जंगलातील मानवी अतिक्रमणाचे परिणाम दिसू लागले असून पुण्याच्या खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरुर या तालुक्यांमध्ये बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे. या तालुक्यांत सातत्याने बिबटे मानवी वस्तीत दिसून येत आहेत. बुधवारी सकाळी राजगुरुनगर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या चांडोली येथील कार्यालयात एक बिबट्या शिरला. या बिबट्याने कार्यालयातील एका अडगळीच्या ठिकाणी आपला डेरा टाकला. तो काही केल्या तेथून हलत नव्हता. हे पाहून कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. गत काही दिवसांपासून एक बिबट्या आपल्या बछड्यांसह महावितरण कार्यालयाच्या परिसरात वावरत असल्याचे दिसून आले होते. हा बिबट्या तोच असल्याचा सांगितले जात आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. जुन्नर व कोकणातच काही ठिकाणी बिबट्याने मनुष्यावर हल्लेही केलेत. त्यातच महावितरणच्या कार्यालयात बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

