मधुभाऊ चौधरी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन
अहिल्यानगर : “माझे वडील मधुभाऊ चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काहीतरी भरीव सामाजिक योगदान देण्याचा विचार मनात होता. त्यावेळी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या लोकांची भेट झाली आणि मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्ताव आला. चौधरी कुटुंबीय मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहे. समितीच्या सहाय्याने साठ मुलींच्या वसतिगृहाची उभारणी झाली आणि त्याचे आज उद्घाटन होत आहे. ही आनंदाची गोष्ट असून, दिलेले दान सत्कारणी लागल्याचे समाधान वाटतेय,” अशी भावना ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केली.
परिमल आणि प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या सहयोगातून अहिल्यानगर (अहमदनगर) येथे विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कै. म. कृ. उर्फ मधुभाऊ चौधरी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन परिमल आणि प्रमोद चौधरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्नेहालयचे संस्थापक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, डॉ. ज्योती गोगटे, रत्नाकर मते, संजय अमृते, कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर आदी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “समितीचे कार्य युवकांच्या पिढीला आकार देणारे आहे. त्यांनी दिलेला प्रस्ताव भावला. वर्षभरातच तो उभारावा, या विचाराने सर्वतोपरी सहकार्य केले. आज त्याला मूर्त रूप आल्याचे समाधान आहे. समितीच्या कार्याचा विस्तार समाजाला हितकारक आहे. परदेशातही समिती पोहोचली आहे. चांगल्या संस्थेच्या चांगल्या उपक्रमाला पैसे दिल्याचा आनंद आहे.”
गिरीश कुलकर्णी म्हणाले, “नगरसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. अनेक चांगल्या संस्थांची पायाभरणी दादा चौधरी यांनी केली आहे. त्यांच्या विचारांचा, त्यागाचा व दातृत्वाचा वारसा चौधरी कुटुंबाने जपला आहे. समितीच्या माध्यमातून चांगला उपक्रम नगरला झाला असून, परिसरातील मुलींना त्याचा लाभ होईल. समाजाला एकसंध ठेवण्याचा संस्कार समिती रुजवत आहे.”
प्रतापराव पवार म्हणाले, “उत्तम विद्यार्थी व नागरिक घडविण्याचे काम समितीमार्फत नगरमध्येही होत राहील. नगरवासी आणि समितीचा मोठा ऋणानुबंध आहे. आता ही वास्तू तुमचीच झाली आहे. त्यामुळे या कामात आपण भविष्यात हातभार लावावा. मुलींचे शिक्षण, उत्कर्ष आणि सामाजिक जडणघडण यावर समितीने कायमच भर दिला आहे.”
शामराव निसळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चौधरी आणि निसळ यांचा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या दोन्ही कुटुंबाने सामाजिक योगदान दिले आहे. मधुभाऊंच्या शताब्दीनिमित्त हा प्रकल्प साकार झाल्याचा आनंद वाटतो, असे त्यांनी नमूद केले.
तुकाराम गायकवाड यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. रविंद्र देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार रंजनकर यांनी आभार मानले.