पुणे- पुण्यामुंबईतील हिट अँड रन च्या अगरवाल -शहा यांची प्रकरणे तळपत असतानाच पुण्यात काल रात्री २ अपघातात २ पोलीस मृत्युमुखी पडले तर १ पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे .
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर रविवारी मध्यरात्री एका भरधाव कारने 2 पोलिसांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, पुणे – मुंबई महामार्गावरील खडकी अंडरपास हॅरीस ब्रिजच्या जवळ रविवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. समाधान कोळी असे मृत, तर पी सी शिंदे असे जखमी पोलिसाचे नाव आहे.आणखी एका पोलिसाचा अपघाती मृत्यू- काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पोलीस हवलदार सचिन विष्णू माने, (वय 48) नेमणूक सी.आय.डी., पुणे यांच्या अँक्टीव्हा गाडीला पिंपळे सौदागर येथे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला
पोलिसांच्या माहितीनुसार, समाधान कोळी व पी सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून मुंबई – पुणे हायवेवर गस्त घालत होते. तेव्हा भरधाव वेगातील एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे जबर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शिंदे यांना लगतच्या रुबी रुग्णालयात हलवले. तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृत समाधान कोळी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
या गंभीर आणि दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉलमध्ये जाऊन मयत पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली तर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची डॉक्टरांकडे विचारपूस केली.
पोलिसांच्या मते, या दोघांना पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारने उडवले. पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने या कारचा शोध घेत आहेत. दुसरीकडे, पुण्यातील सीआयडीमध्ये काम करणाऱ्या गणेश शिंदे नामक अन्य एका पोलिस कॉन्स्टेबलचाही अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. शिंदे हे पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर भागातून दुचाकीवरून घरी परत येत होते. पण रस्त्यात कार चालकाने त्यांना धडक देऊन पोबारा केला. पोलिस या वाहनाचाही शोध घेत आहेत.