कोकणातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. धडकी भरवणारे पावसाचे व्हिडिओ देखील समोर आला आहे. या पावसात अनेक पर्यटक अडकून बसल्याची देखील भीती आहे. या सर्व परिस्थितीवरून रायगड किल्ला 8 जुलैपासून पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.सध्या राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला झालाय. यामुळे रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसात पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.दरम्यान, येत्या काही तासांतच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. याशिवाय पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुठलेही स्टंट करून जीव धोक्यात टाकू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे.