पुणे : डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी ‘मितरंग’ टोपणनावाने रचलेल्या बंदिशींवर आधारित विशेष शास्त्रीय गायन मैफल येथे नुकतीच झाली. आशयघन बंदिशी आणि त्याला लाभलेल्या रसिकांचा प्रतिसादाने ही संगीतसभा रंगतदार झाली.
श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) आणि नगरच्या श्रुती संगीत निकेतनच्या संयुक्त विद्यमाने ही मैफल आयोजित केली होती.
‘एसएनडीटी’ सभागृहात झालेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, संस्कृत पंडित, महामहोपाध्याय, आदर्श संगीत शिक्षक डॉ. खरवंडीकर यांचे संगीतातील योगदान फार मोठे आहे. त्यांनी रचलेल्या बंदिशींची निर्मिती प्रक्रिया, सौंदर्य, बंदिशींमागील प्रेरणा आदी बाबी निवेदन आणि गायनातून उलगडून दाखवण्यात आल्या. अतिशय रंगलेल्या या मैफलीत प्रचिती खिस्ती आणि नम्रता जहागीरदार यांनी ‘धृपद’ व ‘तराणा’ सादर केला, अर्पिता वैशंपायन यांनी ‘ललत’ रागातील बंदिश, मकरंद खरवंडीकर यांनी ‘विलासखानी तोडी’ व ‘रागमाला’, तसेच परिमल कोल्हटकर यांनी ‘श्री’ रागातील बंदिश, हृषिकेश गांगुर्डे यांनी ‘परज’ रागातील, तर कविता खरवंडीकर यांनी ‘वृंदावनी सारंग’ रागातील बंदिशी सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता पं. विकास कशाळकर यांनी सादर केलेल्या हमीर रागातील दोन बंदिशींनी झाली. त्यानंतर डॉ. खरवंडीकर यांची ‘भैरवी’ रागाचे ध्वनिमुद्रण ऐकवून या मैफलीची सांगता करण्यात आली.
सर्व कलाकारांना तबल्यावर धनंजय खरवंडीकर, प्रसाद सुवर्णपाठकी यांनी, तर हार्मोनियमवर संकेत सुवर्णपाठकी यांनी समर्पक साथसंगत केली. बंदिशींवर सुरेख विवेचन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी आपल्या निवेदनातून केले. माणिक देव यांनी कलाकारांचा परिचय करून दिला व आभार मानले.
यावेळी पदव्युत्तर संगीत विभागप्रमुख डॉ. शीतल मोरे, पं. सुहास व्यास, पं. राजीव परांजपे, तबलावादक सचिन भोसले, मिलिंद तायवाडे, अरुण गवई इत्यादी मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीत रसिक उपस्थित होते.
खरवंडीकरांच्या बंदिशींचा उलगडला ‘मितरंगी’ प्रवास
Date: