पुणे-भगवान श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या वारकऱ्यांचे साधू वासवानी मिशनतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी मिशनमध्ये विसावा घेतला. ‘विठ्ठल विठ्ठल…जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात आणि अभंगांचे तालबद्ध आवाजात गायन करत पायी वारी करणाऱ्या या वैष्णवांचे साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी आणि सदस्यांनी भक्तीभाव आणि जल्लोषात स्वागत केले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी आणि सर्व उपस्थित साधक भगवान श्री विठ्ठलाची आळवणी करणारे अभंग, पारंपारिक भक्तिगीतांच्या गायनात उत्साहाने सहभागी झाले. या निमित्त प्रसाद वाटपाचे आयोजनही करण्यात आले. वारकरी आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतात, ते सर्व पदार्थ यावेळी वाटप करण्यात आले. या माध्यमातून उपस्थितांमध्ये आध्यात्मिक बंध आणखी जुळून आले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी, उपस्थित वारकरी आणि अन्य साधकांनी दादा जे. पी. वासवानी यांच्या आगामी वाढदिवसाच्या अनुषंगाने क्षमाप्रार्थना देखील केली. दादा वासवानी यांचा जन्मदिवस हा जागतिक क्षमा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त दि. २ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता २ मिनिटे शांतता पाळण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दरम्यान, मिशनतर्फे आयोजित या स्वागत आणि सेवा उपक्रमावेळी एका वारकऱ्याने सांगितले, की “साधू वासवानी मिशन येथे भेट देण्याची माझी ही तिसरी वेळ आहे. मी जेव्हा जेव्हा येथे भेट देतो, तेव्हा मला शांतता मिळते. तसेच भगवान विठ्ठलाच्या सानिध्याचा अनुभव येतो.