सासवड / औदुंबर भिसे – टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोषकरीत क-हा नदीच्या काठावरील संवत्सरनगरीत संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रात्री उशीरा दहा वाजता पोहोचला . सासवड नगरवासीयांनी माउलीसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले . माउलींचा येथे दोन दिवस मुक्काम आहे .
माउलींची पहाटेची पुजा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ ॲड राजेंद्र उमप यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ , सदस्य भावार्थ देखणे , व्यवस्थापक माउली वीर व मानकरी उपस्थित होते .
पुणेकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेवुन माउलीसह वैष्णवांनी पुण्यनगरीचा निरोप घेतला . पुणे ते हडपसर मार्गावर पुणेकरांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती .
सकाळी ९ वा सोहळा शिंदे छत्री येथे पोहोचला . येथे आरती करुन सोहळा सकाळी १० . ३० वाजता हडपसर येथे सकाळच्या न्याहरीसाठी पोहोचला . यंदा मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाउस झाल्याने पेरण्या उरकुन वारकरी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले . सोहळ्यात वारकरी व वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने या गर्दीला वाट करुन देताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली . यंदा दरवर्षी पेक्षा सोहळा दोन तास उशीरा नियोजित ठिकाणी पोहोचत होता . न्याहरी व दर्शनानंतर सोहळा दुपारच्या फराळासाठी दुपारी १ . ३० वाजता उरळी देवाची येथे पोहोचला . वारक-यानी येथे दुपारचा फराळ घेतला .
दुपारी २ वाजता पावसाची भूरभूर सुरु झाली . या पावसाचा आनंद घेत दुपारी ३ . ३० वा सोहळा वडकी नाला येथे विश्रांतीसाठी पोहोचला .
सायंकाळी ४ . ४० वाजता अश्व तर सायंकाळी ५ . १० वाजता माउलींचा सात बैलजोड्या लावलेला व आकर्षक फुलांनी सजविलेला रथ दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचला . हजारो भाविकांचे हात माउलींच्या सोहळ्याचे चित्रण करण्यासाठी मोबाईल कॅमेरासह उंचावले व दिवेघाटातील हा नयन रम्य सोहळा टिपण्यासाठी सरसावले . ढगाळ वातावरणात व माउली माउली नामाच्या जयघोषात माउलींच्या पालखी सोहळ्याने दिवेघाट चढायला सुरुवात केली . टाळ मृदुंगाचा गजर व माउली नामाच्या जयघोषात सह्याद्रीच्या पर्वतरांगा दुमदुमून गेल्या .
यंदा मृग नक्षत्रात पाउसाने वेळेवर हजेरी लावल्याने हिरव्या गर्द झाडीत सह्याद्रीच्या पर्वत रांगा जणु हिरवा शालु नेसून माउलींसह वैष्णवांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या . पोलिसांनी अत्यंत शिस्तबध्दरीत्या वारीतील वाहने गर्दीतुन पुढे काढल्याने दिवे घाटात वाहनांची गर्दी मात्र दिसून आली नाही . या पोलिसांना वाहने काढण्यासाठी व सोहळ्यातील गर्दी रोखण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थ्यानी चांगली मदत केली . नागमोडी वळणाचा सहा किलोमिटरचा दिवेघाट गर्दीतुन पार करण्यासाठी माउलीला तब्बल सव्वातास लागला . पावणेसात वाजता हा सोहळा झेंडेवाडी येथे पोहोचला . ग्रामस्थांसह तालुका प्रशासनाने सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले . अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला . तब्बल अडीच तास उशीरा रात्रो साडेनउ वाजता माउलींचा सोहळा सासवड मुक्कामी पोहोचला . रात्रो दहा वाजता समाज आरती झाली . येथे सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम आहे .