पुणे:प्लस व्हॅलीतील पाण्याच्या कुंडात शनिवार (ता.२९) दुपारी वाहुन गेलेल्या स्वप्निल धावडे (वय-३८, रा.भोसरी, पिंपरी-चिंचवड) याचा मृतदेह देवकुंड धबधबा येथे काल सकाळी अकरा वाजता बचावपथकाला मिळून आला.दोन दिवस पन्नास जणांच्या बचावपथकाने भरपावसात शोधकार्य राबविले.
शनिवारी (ता.२९) दुपारी स्वप्निल व त्यांचे मित्र प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी आले होते.
स्वप्निल पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेले. एका कुंडातून दुस-या कुंडात पडले. तेव्हापासून ते दिसून आले नाहीत. जोराच्या पावसामुळे प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. पौड पोलिस,ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, शिवदुर्ग टीम लोणावळा, नातेवाईक यांनी प्लस व्हॅलीच्या वरील बाजुच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये व आसपासच्या परिसरात शोध घेतला. तर रोहा-रायगड रेस्क्यु टीम, शेलार मामा रेस्क्यु टीम यांच्या पथकाने प्लस व्हॅलीतून खालील बाजुस प्रवाहीत होऊन तयार होणा-या देवकुंड धबधब्याच्या परिसरात शोध घेतला.
जोराचा मुसळधार पाऊस, दाट धुके, निसरडे वातावरण या मुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते.मुळशी तालुक्यात डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह प्रथम मिल्कीबार मग प्लस व्हॅलीतून देवकुंड धबधबा येथून रायगड हद्दीत पडतो. हा मृतदेह दोन दिवस वर कुंडामध्ये कोठेतरी अडकून पडला होता. हा मृतदेह सकाळी अकरा वाजता देवकुंड धबधब्यातून खाली पडला.व अखेर शोधकार्य थांबले.
सैन्यदलात १८ वर्ष सेवा बजावल्यानंतर स्वप्नील धावडे अलीकडेच निवृत्त झाले होते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टंट करणं जिवावर बेतलं…
गेल्या काही दिवसांत राज्यभरात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळं अनेक पर्यटक मान्सून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे त्यांची भारतीय सैन्यादलात निवड झाली होती. १८ वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहेत. स्वप्नील सध्या जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. शनिवारी ते आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. स्वप्निल यांनी स्टंट करत धबधब्यात उडी मारली. त्यानंतर त्यानं बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाहात त्याला बाहेर येता आलं नाही आणि तो बेपत्ता झाला आहे. विशेष म्हणजे स्वप्निलच्या या स्टंटचा व्हिडिओ त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तो एका उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारताना दिसत आहे. तसेच त्यानंतर त्यानं बाहेर येण्यासाठी केलेली धडपडही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.