राजीव साबडे लिखित ‘वार्तांच्या झाल्या कथा’चे प्रकाशन
पुणे : “घडलेल्या घटना, समाज व व्यक्तींकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. बातमीच्या निमित्ताने पत्रकारांचा त्याच्याशी अधिक जवळचा संबंध येतो. बातमीमागील कथा अनेकांना माहित नसतात. त्यामुळे पत्रकारांनी त्या पुस्तकरूपात आणल्या, तर नव्या पिढीला जुन्या नोंदी संदर्भासहित स्पष्ट होण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी ३४ वर्षांच्या पत्रकारितेत वार्तांकन केलेल्या विविध घटनांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘वार्तांच्या झाल्या कथा’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. रानडे इन्स्टिट्यूट परिसरात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय तांबट आदी उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “राजीव आणि माझा स्नेह जवळपास चार दशकांचा आहे. विचारांचे व व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असल्याच्या काळात त्यांनी केलेली पत्रकारिता आदर्शवत होती. विविध घटनांचे चित्रण कथारूपात करण्याची कल्पना अभिनव आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, ‘पेपर टू पेपरलेस’ असा क्रांतिकारी प्रवास होत आहे. स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरावरील घडामोडींचा लेखाजोखा असलेले हे पुस्तक पुण्याला आणि समाजाला मिळालेली देणगी आहे.”
प्रतापराव पवार म्हणाले, “पत्रकारांना बाहेरच्या जगात काय काय घडते आहे, हे माहीत व्हावे म्हणून देशात-परदेशात पाठविण्याचे धोरण आम्ही राबविले. त्याचा परिणाम पत्रकारांना व्यापक दृष्टी मिळण्याबरोबर वाचकांना सर्वंकष माहिती मिळण्यास झाला. साबडे यांनी अयोध्येसारख्या अवघड विषयांचे केलेले वार्तांकन सखोल आणि अचूक असल्याने त्याचे कौतुक संसदेतही झाले.”
राजीव साबडे म्हणाले, “पत्रकारिता करताना पुण्यातीलच नाही, तर जगभरातील महत्त्वाच्या घटनांच्या वार्तांकनाची संधी मिळाली. त्यातील काही विषयांची व्याप्ती एकेका कथानकासारखी होती. त्यातील निवडक विषय अनेकांना माहीत नसलेल्या संदर्भांसह कथा रूपात देण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे.”
प्रा. डॉ. संजय तांबट यांनी राजीव साबडे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी आपले अनुभव पुस्तकरूपात आणावेत. जेणेकरून पत्रकारिता शिकू पाहणाऱ्या तरुणांना ही पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील, असे नमूद केले. प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशकीय बाबी स्पष्ट केल्या. श्रीपाद ब्रह्मे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.