पुणे : विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्णब्रह्म तो पंढरीनाथ… असे कीर्तनाद्वारे सांगण्यासोबतच ज्ञानोबा माऊली, तुकाराम च्या नामघोषाने ऐतिहासिक लालमहालाचा परिसर दुमदुमून गेला. वारकरी सांप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचावत विठुरायाच्या भेटीसाठी कित्येक मैल चालत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी पुण्यात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील लालमहाल येथे सलग ८ कीर्तनांच्या कीर्तनमालेला वारकरी भक्तांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे वै.ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनमालेचे उद्घाटन लाल महालाचे सुरक्षा रक्षक संजय अंबवले, सोमनाथ भोंडे व स्वछतादूत सुषमा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष सी. ए. जनार्दन रणदिवे, माजी अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते उपस्थित होते.
कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस बडवे, शेखर व्यास, संज्योत केतकर, प्रा. संगीता मावळे, रेशीम खेडकर, विकास दिग्रसकर, चिन्मय देशपांडे, वासुदेव बुरसे यांनी कीर्तने केली. संतपरंपरेचे महत्व आणि महात्म्य कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. योगेश देशपांडे, सिद्धार्थ कुंभोजकर (तबला), उदय शहापूरकर, होनराज मावळे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, प्रबोधिनीतर्फे वेगळ्या प्रकारे वारक-यांचे स्वागत करीत त्यांना नारदीय कीर्तनाचा आनंद देण्याचा प्रयत्न कीर्तनमालेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. हजारो वारकरी, दिंडीप्रमुख या कीर्तनमालेचा आनंद घेण्याकरीता लालमहालात येतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. मुक्कामाच्या दिवशी देखील वारकरींच्या स्वागतासाठी पुणेकरांची जयत्त तयारी सुरू असते. त्यामध्ये हा आगळावेगळा उपक्रम प्रबोधिनी तर्फे राबविला जातो.