जालना- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.दरम्यान मिळालेल्या मसहितीनुसार नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृताची ओळख पटली नाही.जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.