पुणे-शहरात झिका विषाणूने बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे वेळीच हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा रॅश आलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यावर त्यांची सर्व माहिती महापालिका आरोग्य विभागाला कळवावी, असे आवाहन पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून सर्व खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा, पॅथोलाॅजी लॅब यांना करण्यात आले आहे.
पावसाला सुरवात झाली, की साथीच्या आजारांसह डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढतात. पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आजारांचे डोके वर काढतात. त्यामुळे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत असतो.
तरीदेखील काही बेजबाबर व्यक्तींमुळे डास उत्पत्तीची ठिकाणे वेळीच नष्ट न केल्याने डास वाढून आजारांना निमंत्रण मिळते. दि. 21 जून रोजी एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण सापडल्यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. त्यानुसार या परिसरात सर्वेक्षण, तपासणीसाठी पथके तयार करून युद्धपातळीवर आरोग्य तपासणी केली जात आहे.
धक्कादायक म्हणजे ताप, अंगदुखी, खोकला झाल्यास अनेक रुग्ण फॅमिली डाॅक्टर किंवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. जास्तीत जास्त डेंग्यूची तपासणी केली जाते. रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल होतात. मात्र, खासगी रूग्णालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीच माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जात नाही.
त्यामुळे परिसरात रुग्णसंख्या वाढल्यानंतर सर्वांना जाग येते. वेळीच प्रादूर्भाव रोखण्यासाठी दवाखाना किंवा लॅबमध्ये आलेल्या रुग्णांची तपासणी केल्यावर संशयित व्यक्तीची माहिती आरोग्य विभागाला द्यावी.
जेणेकरून पुढील औषधोपचार, सर्वेक्षण, तपासणी आणि औषध फवारणी करून प्रादूर्भाव रोखता येऊ शकेल. त्यासाठी pmckitak@gmail.com या ईमेलवर रुग्णांची सर्व माहिती पाठवावी, असे आवाहन सहायक आरोग्य अधिकारी तथा साथरोग नियंत्रण विभागप्रमुख डाॅ. राजेश दिघे यांनी केले.
महिन्यांनी झिका रुग्ण सापडला
एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडे दाखल संशयित रूग्णांची माहिती मागवली. त्यामध्ये 30 मे रोजी नोबेल रुग्णालयातील रुग्णाला झिकाची लागण झाल्याचे समोर आले.
महिन्याभरानंतर रुग्ण सापडल्यावर प्रादूर्भाव आटोक्यात कशा येईल. तेच अहवाल येताक्षणी रुग्णालय, संबंधित पॅथाॅलाॅजी विभागाने माहिती कळवली असती, तर त्या भागात सर्वेक्षण, तपासणी केली असती. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ माहिती द्यावी.