मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे निर्देश
पुणे, दि. २६ जून २०२४:‘महावितरण अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विद्युत अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यासह सार्वजनिक व घरगुती विद्युत अपघातांचे प्रमाण शून्यवत करणे हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात वीजसुरक्षेचा घरोघरी जागर करावा. विद्युत धोके टाळण्यासाठी खबरदारी व उपायांची नागरिकांना माहिती द्यावी असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. २६) दिले.
महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या वतीने दि. २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रास्तापेठ येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात या सप्ताहाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले यांची उपस्थिती होती.
श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘मानवी असो वा पशूप्राण्यांचा, जीव सर्वाधिक महत्वाचा आहे. त्याची भरपाई करता येत नाही. पावसाळ्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे विद्युत धोके वाढले आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेमुळे कोणालाही धोका निर्माण होणार नाही यासाठी दक्ष राहावे. तसेच प्रामुख्याने घरगुती व सार्वजनिक ठिकाणी विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांशी विविध माध्यमांद्वारे संवाद साधून माहिती द्यावी’.
याकार्यक्रमात वेळी उद्योग, ऊर्जा विभागाचे सहायक विद्युत निरीक्षक श्री. सुहास देशमुख, सहायक अभियंता श्री. अजित शिंदे तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी विद्युत अपघाताचे धोके व उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता सर्वश्री धनराज बिक्कड, मनीष सूर्यवंशी, भाऊसाहेब सावंत, अशोक जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंते (प्रशासन व सुरक्षा), सहायक अभियंते उपस्थित होते.
पुणे परिमंडलामध्ये येत्या २ जुलैपर्यंत वीजसुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अभियंता व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबतच विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना वीजसुरक्षेच्या उपाययोजनांची व खबरदारीची माहिती देण्यात येणार आहे.