पुणे शहरातर्फे ‘विचारतात पुणेकर’ आंदोलन : अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजन
पुणे : पुणे नक्की विद्येचे माहेरघर की उडता पंजाब ? पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात चूक कोणाची ? गल्लोगल्ली मिळणाऱ्या अमली पदार्थाचे मार्केटिंग कुणाचे ? गोळ्या बिस्किटांसारखे आज पुण्यात ड्रग्स, एमडी आणि गांजा मिळत आहे, याच्यावर नक्की पोलीस प्रशासन काय करणार? असे विविध प्रश्न विचारत पुण्याचा उडता पंजाब होऊन देणार नाही अशा घोषणा पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
पतित पावन संघटना पुणे शहराच्या वतीने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिनानिमित्त ‘विचारतात पुणेकर’ हे आंदोलन डेक्कन येथील गुडलक चौकात करण्यात आले. यावेळी संघटनेचे शिवाजीराव चव्हाण, दिनेश भिलारे, प्रसाद वाईकर, संतोष शेंडगे, गुरु कोळी, प्रवीण झवर, अक्षय जम्बुरे, अशोक परदेशी, राजाभाऊ कारखूड, यादव पुजारी, सुरज पोटे, विजय क्षीरसागर, राहुल शिंदे, स्वप्निल आंग्रे, योगेश करपे, शिवराज निवदेकर, आबा पानसरे उपस्थित होते.
स्वप्निल नाईक म्हणाले, गणेशोत्सव मंडळांवर गणेशोत्सव काळामध्ये रात्री १० नंतर सक्तीची आवाजबंदी लादली जाते. परंतु या पब विकृतीला नक्की कोणाचा आश्रय आहे. गणेश मंडळांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवले जातात परंतु याच पब विकृतीसाठी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बांधले जातात. पुण्यातील सर्व राजकीय पक्षांनी ड्रग्सरहित पुण्यासाठी आणि पुण्याच्या अस्मितेसाठी एकत्र यावे, असे आवाहन देखील नाईक यांनी केले.
सध्या पुण्यात झालेल्या घटना पाहता अमली पदार्थांच्या बाबत परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याशिवाय कोयता गॅंग, नाईट लाईफ, गुटखा-गांजा विक्री,हिट अँड रन, विस्कळीत वाहतूक हे सर्व रोज पाहणे चिंताजनक आहे. पुणे शहराच्या अस्मितेसाठी पतित पावन संघटना कटीबद्ध आहे. जर पुण्यात पब,अवैध धंदे बंद झाले नाही तर संघटना पुण्याची संस्कृती वाचवण्यासाठी कायदा हातात घेतल्या शिवाय राहणार नाही.