पुणे : – लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. दरम्यान, पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची मुंबईत भेट घेऊन विधानपरिषदेच्या एका जागेची मागणी केलेली आहे.विधानसभेच्या आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यासाठी विधानपरिषदेच्या जाहीर झालेल्या ११ जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घ्यावी ही लेखी मागणी पुण्यातील शिष्टमंडळाने अजित पवारांकडे केली आहे.पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासाठी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत. त्यातील अजित पवार यांच्या (बारामतीसह) ९ जागा पवार गटाकडेच आहेत.“आम्ही अजित पवार यांची भेट घेतली व त्यांच्याकडे विधान परिषदेच्या एका जागेची मागणी केली, हे खरे आहे. अजित पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे ते नेत्यांकडे नेले पाहिजे. मागणीच झाली नाही असे व्हायला नको म्हणून आम्ही भेट घेतली” अशी माहिती दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष ) यांनी दिली आहे.
पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागाही तिथे मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेच्या ११ जागांमध्ये किमान १ जागा पक्षाने पुण्यासाठी घ्यायलाच हवी, असे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्याकडून एक आमदार असणे गरजेचे आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होईल, त्यावेळी त्याचा चांगला उपयोग होईल, असे भेटीला गेलेल्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.लोकसभेतील मताधिक्याचे कारण पुढे करत भाजपकडून विधानसभेला पुण्यात कदाचित जास्त जागा मागितली जाईल. त्यापूर्वीच विधान परिषदेतील एक जागा पदरात पाडून केलेली बरी, असा विचार या मागणीमागे असल्याचे वृत्त आहे