गुरूवार, दि. २७ जून ते शनिवार, दि. २९ जून २०२४
पुणे, दि २५ जून : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने (गुरूवार, दि. २७ जून ते शनिवार, दि. २९ जून २०२४) या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थाना निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान/प्रवचन/कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सायंकाळच्या ५.१५ ते ६.१५च्या सत्रात पुणे येथील ह.भ.प.श्री. धर्मराज महाराज हांडे, परभणी येथील ह.भ.प श्री. ठाकुरबुवा दैठणेकर आणि आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसनमहाराज साखरे यांची व्याख्याने / प्रवचने होणार आहेत.
सायंकाळच्या ७ ते ९ च्या सत्रात जालना येथील ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर) यांची कीर्तने होणार आहेत.
रोज रात्री ९.१५ ते ११.३०च्या सत्रात श्रृती पाटील आणि सहकारी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील कलाकारांची भेट असेल. तसेच, श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे याचा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचे दर्शन करणारी सुवर्णपिंपळ ही आध्यात्मिक नाट्यकृतीचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच सकाळच्या सत्रात ह.भ.प. श्री. शालीकराम महाराज खंदारे, ज्ञानेश्वर भक्त ह.भ.प. श्री अर्जुन महाराज लाड गुरूजी व ह.भ.प. श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांचीही कीर्तने होणार आहेत.
त्याच प्रमाणे दुारी २ ते ४.३० वाजेपर्यंत सदानंतद कडूळे, भागवत, सांगळे, कु. वैष्णवजी देवसरकर यांचा अभंगवाणी कार्यक्रम, गोदावरीताई मुंडे, हभप रमेशबुवा शेनगांवकर, हभप दिंगरबुवा कुटे, व हभप ज्ञानेश्वर माऊली गीते यांचा सांप्रदायिक अभंग गवळणीचा कार्यक्रम आणि राजा परांजपे प्रतिष्ठान निर्मित अभंगरंग हा कार्यक्रम गायक संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे व अपर्णा केळकर सादर करणार आहेत.
काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ व विश्वदर्शन देवता भजनी मंडळ, विश्वराजबाग, पुणे हे करतील.
अशी माहिती युनेस्को अध्यासन प्रमुख व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.