पुणे – गेल्या सहा महिन्यांपासून कोरेगाव पार्क, बंड गार्डन, ढोले पाटील रोड येथील रहिवासी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. येत्या १० जुलैपर्यंत वाहतूक सुरळीत व्हावी, अशी अंतिम मुदत वाहतूक पोलीस खात्याला देत आहोत, असा इशारा ‘वेक अप’ पुणे चळवळीचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला. रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही आवाहन जोशी यांनी केले.
वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पोलीस खाते प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने वाहतूक विभागाने प्रयोग केले, पण ते परिणामकारक ठरत नाहीत, असे लक्षात आले. रहिवासी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विचार करण्यासाठी पोलीस खात्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्यासमवेत स्थानिक रहिवाशांची बैठक माजी आमदार आणि ‘वेकअप’ पुणे चे संयोजक मोहन जोशी यांनी घेतली. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, सध्या एकेरी करण्यात आलेला बंडगार्डन रोड, मंगलदास रोड व आजपासूनच सुरू करण्यात आलेल्या कोरेगाव पार्क मधून अमृतलाल मेहता मार्गे बोट क्लब रोड वर जाण्याची एकेरी व्यवस्था याची पुढील दोन आठवड्या साठी पाहणी करण्यात येईल. या वाहतूक व्यवस्थेने वाहतूक समस्येत कुठलाही बदल झाला नाही तर १० जुलै २०२४ नंतर बंड गार्डन रस्ता पूर्वी प्रमाणे दुहेरी करण्यात येऊन बोट क्लब रोड वरून अमृतलाल मेहता मार्गे कोरेगाव पार्क मध्ये जाण्या साठी हा पथ एकेरी करण्यात येईल, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
साधू वासवानी पुलाच्या पाडकामा आधी साधारण वर्षभरापूर्वी मोहन जोशी आणि धैर्यशील वंडेकर यांनी सूचना केली होती की, मंगलदास रोड वरून रेसिडेन्सी क्लब कडे जाण्या साठी डाव्या बाजूने निर्वेध वाहतूक व्यवस्था, वाडिया कॉलेजच्या सहकार्याने करण्यात यावी. या सूचनेचा पुणे महानगरपालिका व वाहतूक विभागाने तात्काळ पाठपुरावा करून कारवाई करण्या विषयी पुन्हा विनंती करण्यात आली.
याखेरीज केळकर रस्ता आणि भिडे पूल याच्या दरम्यान होत असलेल्या वाहतूक कोंडीचीही चर्चा करण्यात आली. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस नेमावा आणि बॅरिकेड्स ची व्यवस्था करावी, अशी सूचना मोहन जोशी यांनी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे यांनी तत्काळ कारवाई करायचे आश्वासन दिले.
बैठकीत धैर्यशील वंडेकर, समीर रूपानी व डॉ. विद्या दानवे, रोहन सुरवसे, सुरेश कांबळे सहभागी झाले होते. त्यांनी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या.