पुणे:राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह, चार उपायुक्तांची बदली केली होती. त्यानंतर अद्याप या पदांवर कोणत्याही अधिकाऱ्यांची प्रति नियुक्ती झालेली नसली तरी महापालिकेत सध्या कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची बदली होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांची बदली झाल्यास महापालिकेचा कारभार आयुक्त आणि एका अतिरिक्त आयुक्तांवर येऊन पडणार आहे.
राज्यात दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची विकसकामे मार्गी लावण्याची लगबग सुरू असतानाच पालिका आयुक्तांच्या खालोखाल शहराचा प्रशासकीय कारभार सांभळण्यासाठी आवश्यक असलेली सहा उपायुक्तांची पदे रिक्त आहेत.या शिवाय, एक अतिरिक्त आयुक्तांचे पदही रिक्त असून त्यांच्याकडील सर्व खात्यांचा कारभार महापालिका आयुक्तांनी स्वत:कडे ठेवला आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचे चित्र आहे. या शिवाय, या वर्षी महापालिकेच्या अभियांत्रिकी संवर्गातील विभाग प्रमुखांची अनेक पदे रिक्त होत असून त्या जागीही तातडीने नवीन अधिकारी नियुक्त न झाल्यास प्रशासनाची कोंडी होणार असून अधिकारी नसल्याने नागरिकांच्याही कामांचा खोळंबा होत आहे.
महापालिकेत उपायुक्तांची १८ पदे आहेत, त्यात ९ पदे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी तर ९ पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरली जातात. त्यातील शासनाकडील केवळ ३ पदावरच अधिकारी नियुक्त असून उर्वरीत सहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा कारभार महापालिका प्रशासनाने इतर उपायुक्तांमध्ये विभागून दिला आहे. त्यातच या अधिकाऱ्यांना दोन्ही पदांच्या कामकाजावर लक्ष देता येत नसल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचे चित्र आहे.