पुणे, दि.२२: या वर्षीच्या आषाढी पालखी सोहळा २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या मदतीसाठी संबंधित तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे शुक्रवारी (२१ जून) जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुर्घटना प्रतिसाद प्रणालीविषयक प्रशिक्षण आयोजित कऱण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणच्या संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मदतीसाठी महसुल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अन्न व औषध प्रशासन, दूरसंचार विभाग आदी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिगृहित करण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेकरीता लाखो वारकरी व भाविक सहभागी होत असल्याने आषाढी पायीवारी सोहळा शांततेत व नियोजनबद्धपध्दतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर असलेली प्रमाणित कार्यपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत दुर्घटना प्रतिसाद प्रणालीविषयक माहिती देण्यात आली.
यावेळी कर्नल विश्वास सुपनेकर यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने दुर्घटना प्रतिसाद प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विवेक नायडू आणि लखन गायकवाड यांनी गर्दी, चेंगराचेंगरी, कृत्रिम श्वसन, आग प्रतिबंध याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
0000