- माजी ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
- ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान
- ऑलिम्पिक दौडचे आयोजन
पुणे २२ जून २०२४ – महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचलनालयाच्या वतीने उद्या रविवारी (ता.२३) जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे.
या सोहळ्याला सकाळी ७.३० वाजता क्रीडा रॅलीने सुरुवात होणार आहे. लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात होईल. रॅलीमध्ये सर्व ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मान्यवर सहभागी होणार असून, शिवाजी रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज, टिळक रस्त्याने स.प. महाविद्यालयात रॅलीची सांगता होईल. त्यानंतर सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम स.प. महाविद्यालयातच पार पडणार आहे. या वेळी सर्व खेळाडू आणि पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. त्याचबरोबर जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, योगासन, मल्लखांब, मर्दानी खेळांचे सादरीकरण देखिल करण्यात येईल. त्यानंतर सर्व उपस्थित आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिक दिनाचाच भाग म्हणून सकाळी ७.३० वाजता म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल येथे ३ आणि ५ किलो मीटर धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. याच दरम्यान सकाळ ८ वाजता डेक्कन जिमखाना ते म्हात्रे पूल डी. पी. रोड अशा आणखी एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यासह पिंपरी येथील हॉकी मैदानात सायंकाळी ५ वाजता हॉकी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मुंबईत भारतीय क्रीडा मंदिर वडाळा, छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुल, नागपूरात विभागीय क्रीडा संकूल, लातुरमध्ये धाराशीव, नाशिकमध्ये विभागीय क्रीडा संकुल आणि अमरावतीत हनुमान प्रसारक मंडळ येथे ऑलिम्पिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.