नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या दलितांना पुन्हा एकदा पाठीवर झाडू व गळ्यात मडके देण्याचा इशारा देणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या एका पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतप्त झालेत. हे पत्रक काढणारा कुणीही असला तरी त्याला बेड्या ठोका, अन्यथा आम्ही निळ्या झेंड्यासह काळाराम मंदिरात जाऊ, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे.जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू युवा वाहिनीचे एक पत्रक पोस्ट केले होते. या पत्रकात जय श्रीराम व जय हिंदू राष्ट्रचा नारा देत काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या सर्व दलित समाजाच्या लोकांना आपल्या घरांवरील निळे, पिवळे झेंडे काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती.
निळा झेंडा हातात घेणाऱ्यास वाळीत टाकणार
याशिवायही या पत्रकात दलितांविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. तसेच कट्टर हिंदूंना त्यांचा स्पर्श टाळण्याचा सल्लाही यात देण्यात आला आहे. काळाराम मंदिर परिसरात कुठेही निळा, पिवळा झेंडा लावू नये. त्यानंतरही कुणी लावण्याचे धाडस केले, तर त्यांच्या पाठीवर पुन्हा झाडू व गळ्यात मडके देण्यात येईल. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे काळाराम मंदिर परिसरासारख्या पवित्र ठिकाणचे असे झेंडे तत्काळ काढून टाकण्यात यावे. कुणी पुन्हा निळा झेंडा हातात घेऊन फिरताना दिसला तर त्याला वाळीत टाकण्यात येईल, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आले आहे. या पत्रकावर प्रथमेश संदीप चव्हाण नामक हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही किड संपवा… कोण असेल त्याला बेड्या ठोका. आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाणार. बघू कोण रोखते ते, असे आव्हाड यांनी या प्रकरणी हे पत्रक जारी करणाऱ्यांना इशारा देताना म्हटले आहे. या प्रकारामुळे वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे