मोदी स्मशानभूमीत पुरलेले १० महिन्यांचे बाळ गायब
सोलापूर : बालकाचा दफनविधी केल्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या विधीसाठी आलेल्या बालकाचा मृतदेह गायब झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी बाळाचे पिता राहुल वाघमारे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. प्रियांश राहुल वाघमारे (१० महिने) असे मृत बालकाचे नाव आहे.
राहुल वाघमारे यांचा १० महिन्यांचा मुलगा प्रियांश याला डोक्याला मार लागून रक्तप्रवाह झाल्याने त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. नातलगांनी मोदी स्मशानभूमीत त्याच्यावर खड्डा खोदून अंत्यसंस्कार केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने खड्डा बुजवून त्यावर फरशी, दगड, काटेरी झुडूप ठेवले होते.रविवारी बाळाच्या आई-वडिलांसह नातलग मोदी स्मशानभूृमीत पोहचले. येथे बाळाला ज्या ठिकाणी दफन केले होते, तो खड्डा उकरलेला होता. त्याचा मृतदेहही गायब हाेता.
येथील मोदी स्मशानभूमीत पुरलेले १० महिन्यांचे बाळ गायब झाल्याचा प्रकार तिसऱ्या दिवशी उघडकीस आला आहे. कोणीतरी अघोरी कृत्य करण्यासाठी हा प्रकार केला असेल, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. सदर बझार पोलिसांत नातेवाइकांनी याबाबतचा तक्रार दिली आहे. मृत बाळाला फिटचा त्रास असल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयामध्ये ११ जून रोजी दाखल केले होते. उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याच दिवशी मोदी स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार केले. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी(१६ जून) नातेवाईक क्रियाकर्म करण्यासाठी गेले तेव्हा खड्डा खोदलेला दिसला. बाळाला गुंडाळलेले हिरवे कापड बाजूला पडलेले होते. नातेवाइकांनी स्मशानभूमीत इतरत्र शोध घेतला मात्र, बाळ सापडले नाही.घटना कळताच पोलिसांनी श्वान पथक परिसरात आणले. मात्र, श्वान त्या परिसरातच घुटमळले.
मोदी स्मशानभूमीत पुरलेल्या बाळाचा मृतदेह कोणीतरी अघोरी कृत्य करण्यासाठी नेला आहे. ही बाब तिसऱ्या दिवशी उघड झाली आहे. याची चौकशी करण्यासाठी पोलिसांत रीतसर अर्ज दिला आहे, असे बाळाचे आजोबा नितेश उडाणशिवे यांनी सांगितले. दरम्यान, येथील स्मशानभूमीत गेल्या काही महिन्यांत राख पळवण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्या घटनेत आरोपींचा शोध लागला नव्हता.