पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने आयोजन

पुणे : जय हो शंकरा, आदि देव शंकरा…. च्या नामघोषासह जय श्रीराम… च्या घोषणांनी महेश नवमी उत्सवानिमित्त शहराच्या मध्यभागात आयोजित शोभायात्रेने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. घोडे, उंट यांसह बँड पथक, श्री केदारनाथ मंदिरासह शिवलिंगाची फुलांमध्ये साकारलेली मूर्ती व शिवरथ अशा भारलेल्या वातावरणात ४५०० हून अधिक माहेश्वरी समाज बांधव आणि भगिनींनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा सभा आणि समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायण पेठेतील श्री बालाजी मंदिरापासून शोभायात्रा काढून टिळक चौक मार्गे टिळक स्मारक येथे शोभायात्रा समाप्त झाली. यामध्ये अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेचे मधुसूदन गांधी, दक्षिणांचल उपसभापती अरुण भांगडिया, समस्त माहेश्वरी समाजाचे गोविंदा मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उत्सवाच्या नियोजनात संदीप काबरा, मधुसूदन गांधी, सत्यनारायण सारडा, संजय बिहाणी, हिरालाल मालू, दिलीप धूत, महेश सोमाणी, सतीश बजाज, सीमा बंग, सागर लोया, गिरीधर काळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
पारंपारिक वेशभूषेत लेझीम खेळात महिला या शोभयात्रेत सहभागी झाल्या. तसेच डमरू, शंख वादक देखील सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या बग्गी मध्ये शिव पार्वतीच्या वेशातील कलाकार होते. तसेच गंगा अवतरण, महेश उत्पत्ती, बद्रीनाथ, केदारनाथ, शिव परिवार अशा प्रतिकृती आणि प्रसंग सादरीकरण देखील करण्यात आले.
सकाळी ५.३० वाजता रविवार पेठेतील श्री हरिहर मंदिर येथे भगवान श्री महादेव जी यांचा अभिषेक झाला. शोभायात्रेत ७६ हून अधिक संस्था देखील सहभागी झाल्या होत्या. आज शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकारण, न्यायव्यवस्था, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात माहेश्वरी समाजाचे अमुल्य योगदान आहे. समस्त समाजाचे ऋण फेडत सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून झटणारा समाज आहे. सेवात्याग – सदाचार हेच आपले कर्तव्य मानणारा आणि ते पार पाडणारा हा माहेश्वरी समाज आहे. सेवा, त्याग, सदाचार या वाक्याला अनुसरून माहेश्वरी समाज कार्यरत आहे.