पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमच्यावर काहीही टीका केलेली नाही. आरएसएसमधून प्रेरणा घेणारे आम्ही लोक आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आमचे माय-बाप आहेत. मुलांचे चुकलं तर आई-वडिलांनी सांगायचं असतं. आई-वडिलांना सांगण्याचा अधिकार असतो. मुलांनीही त्याच्यातील जे योग्य आहे ते करेक्शन करायचं असतं. आम्ही अशा आई-वडिलांची मुलं नाही आहोत, जे उद्धटपणे आई-वडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतंय, अशी मत राज्याचे मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडले. संघाच्या मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना माझं प्रेमाचं विचारणं आहे की, तुम्ही काय मिळवलं? तुम्ही 18 चे 9 झालात. काँग्रेस 1 चे 13 झालेत आणि शरद पवारांचा पक्ष 4 चे 8 झालेले आहेत. आम्ही तिघेजण एकत्र येऊन राज्यात सरकार आणणार आहोत आणि या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहे, असं संजय राऊत म्हणत आहेत. संजय राऊत हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत. मी नेहमी लॉजिकवर बोलत असतो आणि लॉजिक असं सांगतं की, उद्धव ठाकरेंची पीछेहाट झालेली आहे.
परिश्रम त्यांनी खूप घेतले. चेहरा त्यांचा वापरला गेला. 2019 ला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापाई किंवा काही राजकीय घटना घडल्या त्याच्यावर मात करून पुढे जायचं असतं. पण अशा घटनांमुळे त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारून लोकांमध्ये इमेज केली की हे आता कडक हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष फुटला आहे. लोकसभेत अठराच्या जागा 9 झाल्यात. आता विधानसभेत त्यांच्या 30 च जागा दिसत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
ऑर्गनायझरमधून अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजवपर निशाणा साधला. यावरून भाजप आणि आरएसएसमध्ये मिठाचा खडा पडला का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
पुणे शहरातील एक जागा सोडली तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी भाजपला म्हणावं तसं यश मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांवर महायुतीतील घटकपक्षांचा पराभव झाला. त्यामुळे आज भाजप पदाधिकाऱ्यांच्या पुण्यात बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांची मिमांसा करण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कशापद्धतीने सामना देता येईल, यावर देखील चिंतन करण्यात आले. तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका आज पुण्यात पार पडत आहे.