प्रतिष्ठापना दिनानिमित्त लेखक इतिहासकार काका विधाते यांचा सन्मान
पुणे : पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या ‘तळ्यातील गणपती’ अर्थात सारसबाग श्री सिद्धिविनायक देवताच्या २४० वा मूर्ती प्रतिष्ठापना दिन ज्येष्ठ शुद्ध पंचमी रोजी साजरा करण्यात आला. श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने प्रतिष्ठापना दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मूर्तीला सुंदर आभूषणे आणि वस्त्रांनी सजविण्यात आले होते.
प्रतिष्ठापना दिनाचे औचित्य साधून लेखक काका विधाते यांचा सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
‘देवयोद्धा’ या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांच्यावर तब्बल तीन हजार पानांची संशोधनात्मक महाकादंबरी बरोबरच अग्निरेखा, दर्यादिल दारा शिकोह, दुर्योधन, संताजी, पारध ,भार्गव या पुस्तकांचे लेखन इतिहासकार काका विधाते यांनी केले आहे. शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ व पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांच्या शुभहस्ते श्री सिद्धिविनायकाची महापूजा तसेच सहस्त्रावर्तन व ब्रह्मणस्पती सुक्तने करण्यात आली तसेच सायंकाळी विद्या बेळंबे यांच्या समूहाच्या वतीने श्री विष्णुसहस्त्रनाम व अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. यावेळी ४०० महिलांचा सहभाग होता.
जगन्नाथ लडकत म्हणाले, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील एक लोकप्रिय देवस्थान म्हणून तळ्यातील गणपती प्रसिद्ध आहे. सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली आराध्य दैवत श्री सिद्धीविनायक गणपतीची स्थापना केली होती. यंदा २४० वा वर्धापन दिन थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सुधीर पंडीत यांनी प्रास्ताविक केले. आशिष कुलकर्णी यांनी आभार मानले.
सारसबाग श्री सिद्धिविनायक देवतेचा २४० वा मूर्ती प्रतिष्ठापना दिन साजरा
Date: