पुणे-कुख्यात गुंड बापू नायर टोळीतील गुंड तबरेज सुतार याने थेट कारागृहातून 10 लाखाची खंडणी उकळत आणखी 30 लाख खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, दोघांना अटक केली आहे.सागर धुमाळ आणि अविनाश मोरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुख्य आरोपी गुंड तरबेज सुतार हा कुख्यात बापु नायर टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर तीन खुनाच्या गुन्हयांसह विविध गुन्हे दाखल आहेत. सद्या तो नागपूर कारागृहात बंदी आहे. कोल्हापुर येथील कारागृात शिक्षा भोगत असताना, त्याने तब्बल 14 फोन नंबरचा वापर करुन फिर्यादी यांच्याकडून दहा लाखाची खंडणी उकळली. त्याला फोनवर खुनाची धमकी देण्यात आली होती. तसेच काही गुंड प्रत्यक्षात घरी पाठवून दमही देण्यात आला होता. भितीपोटी दहा लाखाची खंडणी दिल्यानंतरही तरबेजने आणखी 30 लाखाची खंडणी मागीतलीही होती. खंडणी न दिल्यास तीन गुंठे जागा नावावर करुन देण्यास सांगण्यात आले होते. नकार दिल्यावर तरबेजने गुंड पाठवून धमकावने सुरु होते. मागील चार वर्षे कारागृहात शिक्षा भोगत असताना तरबेजकडून हा प्रकार सुरु होता. तरबेज सध्या नागपूर येथील कारागृहात वर्ग झाला आहे.
फिर्यादी व्यवसायिक हा पुर्वी तरबेज सुतारच्या चारचाकी वाहनावर 2012 पासून चालक म्हणून काम करत होता. दरम्यान 2017 मध्ये एका गुन्हयात तरबेज फरार झाला. यानंतर फिर्यादीने नोकरी सोडून जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करत त्यात जम बसवला. हे माहित होताच तरबेजने फिर्यादीकडे दहा लाखाची खंडणी मागीतली, त्यातील तीन लाख उकळलेही. मात्र 2022 मध्ये तरबेजला एका खूनाच्या गुन्हयात अटक झाला. यानंतरही तरबेजने कारागृहातून फोन करुन उर्वरीत रकमेसाठी फिर्यादीला दमदाटी करत उरलेले सात लाख साथीदारांकरवी उकळले.मात्र तरबेजने आणखी 30 लाखाच्या खंडणीची मागणी केल्यावर फिर्यादीने खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली.तबरेज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे सात गुन्हे यापूर्वी दाखल असून, तीन खुनाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर येथील कारागृहात असताना, त्याने तब्बल 14 मोबाईल सिमकार्ड क्रमांक वापरून ही खंडणी उकळली आहे. खूनाची सुपारी दिल्याच्या धाकाने तो खंडणी उकळत होता. तबरेज सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.